एका चिमणीच्या प्रेमाखातर…

माणसाच्या प्राणी-पक्षीप्रेमाची अनोखी उदाहरणे रोज समोर येत असतात. काही दिवसांपूर्वी गायब झालेल्या पोपटासाठी एका महिलेले अन्नपाणी सोडल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता एका चिमणीच्या मृत्यूनंतर अख्खे गाव शोकसागरात बुडाल्याची घटना समोर आली आहे.

कर्नाटकच्या चिक्कबल्लापूर जिह्यातील चिमणीच्या मृत्यूने गावकऱयांना दुःख झाले आहे. गावकऱयांनी एकत्र येऊन शोक व्यक्त केला आहे. या चिमणीशी गावातील लोकांचे खास बंध जुळले होते. चिमणी घरोघरी जायची. प्रत्येक घरात तिच्यासाठी मूठभर धान्य ठेवले जायचे. ते दाणे घेऊन चिमणी भुर्रकन उडून जायची. व्हरांडय़ात सकाळीच येऊन ती गावकऱयांना जागं करायची. लहान मुले तिच्या येण्याची आतुरतेने वाट पहायचे. चिमणीच्या मृत्यूनंतर गावकऱयांनी तिच्या स्मरणार्थ एक चबुतरा बांधला आहे. तसेच चिमणीचा पह्टो असलेले बॅनर झळकावले. तसेच गावभोजन घातले. गावातील ज्येष्ठांनी ही कामगिरी पार पाडली.