कार्तिकीच्या सोहळ्यासाठी पंढरी गजबजली, दोन लाखांहून अधिक भाविक दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन वर्षांनंतर भरत असलेल्या कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरात दोन लाखांवर भाविक दाखल झाले आहेत. भक्तिसागर, चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर, तसेच मठ, संस्थाने आदी भाविकांनी गजबजून गेले आहेत. तर, दर्शनरांग स्कायवॉकवरून ‘सारडा भवन’च्या पुढे गेली असून, दर्शनरांगेत 50 हजार भाविक दाखल झाले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे श्री विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनाकरिता बंद होते. त्यामुळे भाविक पंढरपुरात आले नव्हते. तर, यात्रेची परंपरा खंडित होऊ नये, म्हणून शासनाकडून पंढरपुरात संचारबंदी लागू करीत चैत्री, कार्तिकी, माघी व आषाढी यात्रा साजऱ्या केल्या होत्या. मात्र, या यात्रांना भाविकांना पंढरपुरात प्रवेश नाकारण्यात आला होता. दोन वर्षांच्या काळात आलेल्या यात्रांमध्ये भाविकांना रोखण्यासाठी खास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.

सोमवारी (दि. 15) कार्तिकी एकादशीच्या यात्रेचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. त्यामुळे भाविक पंढरीत मोठय़ा संख्येने दाखल होत आहेत. भक्तिसागर, 65 एकर येथे भाविकांसाठी तंबू व राहुटय़ा उभारून तयार करण्यात आलेल्या निवाऱ्यातही भाविक भजन, कीर्तन व प्रवचनात दंग झाले आहेत. येथे एक लाखाहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. तर, शहरातील मठ, संस्थाने, धार्मिक शाळा व मंदिरांमध्ये लाखो भाविक वास्तव्य करीत असल्याने टाळ-मृदंगांचा आवाज कानी घुमत आहे. भाविकांना यात्रा सुरक्षित व सुलभ व्हावी, याकरिता जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे.

दर्शनरांगेत विविध सुविधा

कार्तिकी यात्रेसाठी येणारे भाविक तासन्तास दर्शनरांगेत उभे राहून दर्शन घेण्यास पसंती देतात. मंदिर समितीकडून स्कायवॉकच्या पुढून ते पत्राशेड येथील 10 दर्शन मंडप ते गोपाळपूर यादरम्यान वॉटरप्रूफ दर्शनरांग उभारण्यात आलेली आहे. तर, दर्शनरांगेत मॅट अंथरण्यात आले आहे. त्याचबरोबर पिण्याचे पाणी, शौचालये, सीसीटीव्ही कॅमेरे, वीज, आरोग्यसुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

बसस्थानकाचा ताबा घेतला खासगी वाहनांनी

ऐन कार्तिकी यात्रेच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी थेट बस स्थानकाच्या फलाटांवरून जीप, स्कूलबसेस अशी खासगी वाहने सुरू करण्यात आली आहेत. परिवहन विभागाच्या पुढाकाराने अगदी एसटीच्या तिकीटदरात पुणे, मुंबई, सोलापूर, मिरज, बार्शी, संभाजीनगरसह विविध भागांत जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुकर झाला आहे.

कार्तिकीसाठी रेल्वेकडूनही जादा गाडय़ा

सध्या कार्तिकी यात्रेसाठी रेल्वेने जादा गाडय़ा सुरू केल्या आहेत. रेल्वेने कुर्डूवाडी, सांगोला, मिरज, सोलापूर आदी स्थानकांपर्यंत येणाऱ्या भाविकांसाठी खासगी वाहतूक महत्त्वाची ठरत आहे. आपत्तीजनक प्रसंगामध्ये प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रवासी वाहतूक होत असली, तरी कोरोना प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. भाविकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असल्याचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांनी सांगितले.

पाच ठिकाणी लसीकरण केंद्रे

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांचे आरोग्य चांगले राहावे, तसेच यात्राकालावधीत देवदर्शनासह कोरोनाविरोधात वारकऱ्यांना संरक्षणकवच देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. त्याचबरोबर भाविकांच्या सुविधांसाठी लसीकरण केंद्रे उभारण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम यांनी दिली. यात्रेच्या पार्श्वभूमीवर लसीकरण केंद्रेही उभारण्यात आली आहेत. लोकमान्य विद्यालय, 65 एकर, नगरपालिका शाळा नंबर 7, गोपाळपूर, नागरी आरोग्य केंद्र या ठिकाणी लसीकरण केले जाणार आहे. जनजागृतीही करणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी सांगितले.