
मुंबईत आज आठ नवीन रुग्ण आढळले असले तरी कस्तुरबा रुग्णालयातील सात जणांच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा झाल्याची माहिती पालिकेच्या उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली. ही बातमी कोरोनाशी लढणाऱया मुंबईकरांसाठी निश्चितच दिलासादायक आहे. कस्तुरबा रुग्णालयात एकूण 170 जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
जगभरात थैमान घातलेल्या ‘कोरोना’ व्हायरसने हिंदुस्थानातही शिरकाव केल्याने मुंबई विमानतळावर पालिका, विमानतळ प्रशासन आणि राज्य सरकारच्या डॉक्टरांकडून थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत आहे. यामध्ये लक्षणे दिसलेल्या रुग्णांना पालिकेच्या चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात आणले जात आहे. आज कस्तुरबा रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये 811 जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 138 कोरोना संशयित आढळले.
23 जानेवारी पासून आजपर्यंत बाह्य रुग्ण विभागात 4493 रुग्णांना तपासण्यात आले. त्यापैकी 1002 संशयित रुग्ण भरती झाले आहेत. मुंबई आणि मुंबई बाहेरील 30 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून यातील मुंबईमधील एकाचा मृत्यू झाला आहे. आता पर्यंत 811 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
खासगी रुग्णालयात ओपीडी आणि स्क्रिनिंग
कस्तुरबा रुग्णालयात 127 आयसोलेशन बेड तयार आहेत. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर, घाटकोपर येथील राजावाडी, वांद्रे येथील भाभा आणि कुर्ला येथील भाभा या रुग्णालयात आयसोलेशन बेड सुरू करण्यात आले आहेत. याशिवाय पालिकेच्या रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी लीलावती, जसलोक, बीपीटी, एचएन, हिंदुजा, वोकार्ड, रिलायंस आदी खासगी रुग्णालयात ओपीडी आणि स्क्रिनींगची सुविधा आज पासून सुरु करण्यात आली आहे.






























































