काझीरंगा अभयारण्य बुडाले, वाघोबांचा घरात आसरा; 17 प्राण्यांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आसाममध्ये पुराचा कहर सुरुच असून जगप्रसिद्ध काझीरंगा अभयारण्यामध्ये पाणी घुसले आहे. 430 चौ.कि.मी. परिसरात पसरलेल्या अभयारण्याचा 95 टक्के भाग पुराच्या पाण्यात बुडाला आहे. यामुळे येथील प्राण्यांना सुरक्षीत स्थळी हलवण्यात येत आहे. याच दरम्यान एका बंगाली वाघाचा फोटो व्हायरल झाला आहे. हे वाघोबा पुराच्या पाण्यातून वाचण्यासाठी चक्क घरामध्ये घुसले आणि बेडवर पहुडल्याचा फोटो समोर आला आले.

‘वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया’ने आसाममधील काझीरंगा अभयारण्यापासून जवळच असणाऱ्या घरामध्ये आसरा घेतलेल्या वाघाचा फोटो ट्वीट केला आहे. पुराच्या पाण्यातून वाचण्यासाठी वाघोबांनी राष्ट्रीय महामार्ग-37 जवळील एका घरामध्ये प्रवेश केला आणि घरातील बेडवर डेरा टाकला. सध्या ‘वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया’ या वाघावर नजर ठेऊन असून त्याला सुरक्षीत बाहेर काढून जंगलामध्ये सोडण्यासाठी प्रयत्न करत आहे.

17 प्राण्यांचा मृत्यू
काझीरंगा अभयारण्यामध्ये पुराच्या पाण्याने थैमान घातले असून आतापर्यंत 17 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. यातील 9 प्राण्यांचा मृत्यू त्यांना सुरक्षीत ठिकाणी हलवताना वाहनाच्या अपघातामध्ये झाला. दरम्यान, अनेक प्राणी अद्यापही पुराच्या पाण्यात अडकले असून त्यांना वाचवण्यासाठी वनाधिकारी कसोशीने प्रयत्न करत आहेत. अभयारण्यात 33 नवी आमि 111 जुने उंच स्थळं बनवण्यात आल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.

2017 मध्य़े झाला होता 361 प्राण्यांचा मृत्यू
काझीरंगा अभयारण्य एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. 2017 मध्ये आलेल्या पुरामुळे या दुर्मिळ प्राण्यावर संकट आले होते. पुराच्या पाण्यात बुडून तब्बल 31 एकशिंगी गेंड्यांसह 361 प्राण्यांचा मृत्यू झाला होता. तसेच 178 हरिण, चार हत्ती आणि चित्त्याचाही मृत्यू झाला होता.