WC 2019 – केदारचे खेळणे तळय़ात-मळय़ातच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, साऊथम्पटन

‘टीम इंडिया’चा मधल्या फळीतील महत्त्वाचा खेळाडू असलेला मराठमोळा केदार जाधव खांद्याच्या दुखापतीतून झपाटय़ाने सावरतोय. त्याने सराव सत्रात सहभागी होऊन घामही गाळलाय. मात्र तरीही केदारचे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या लढतीत खेळणे अजूनही तळ्यात-मळ्यातच आहे.

हिंदुस्थान बुधवारी (दि. 5) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीने आपल्या वर्ल्डकपच्या अभियानाचा श्रीगणेशा करणार आहे. केदार जाधवला गतमहिन्यात आयपीएलमध्ये क्षेत्ररक्षण करताना खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर उर्वरित आयपीएल स्पर्धेला तो मुकला होता. केदारचे विश्वचषक स्पर्धेतही खेळणे संदिग्ध होते. मात्र योग्य वेळी तो दुखापतीतून सावरल्याने ‘टीम इंडिया’बरोबर इंग्लंडमधील वर्ल्डकप मोहिमेवर आला. मात्र वर्ल्डकपपूर्वीच्या दोनही सराव सामन्यांत केदारला खेळविले नाही. आता हिंदुस्थानचा सलामीचा सामना दोन दिवसांवर आलाय, तरीही संघ व्यवस्थापनाने केदार जाधवच्या तंदुरुस्तीबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही. मात्र साऊथम्पटनमध्ये दोनदा झालेल्या नेट सरावात केदारने कसून सराव केला. शिवाय त्याने रविवारी संघसहकाऱ्यांसह जिममध्ये व्यायामही केला. आता बघूया संघ व्यवस्थापन केदार जाधवबाबत काय निर्णय घेते ते.