
केदारनाथ यात्रेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. खराब हवामानामुळे केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. हवामान विभागाने उत्तराखंडसाठी अलर्ट जारी केला आहे. रुद्रप्रयाग जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि वादळाची दाट शक्यता वर्तवण्यात आली असून, या भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे काल मध्यरात्रीपासूनच सतत पाऊस सुरू आहे. यातच भाविकांची सुरक्षा लक्षात घेऊन, रुद्रप्रयागचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी केदारनाथ पायी मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना तात्काळ जवळच्या सुरक्षित ठिकाणी किंवा होल्डिंग पॉईंटवर थांबवण्याचे आदेश दिले आहेत. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
हवामान सामान्य होईपर्यंत कोणत्याही प्रवाशाला पुढे जाऊ न देण्याच्या आणि सर्वांना सुरक्षित ठिकाणी थांबवून त्यांच्यावर सतत लक्ष ठेवण्याच्या सूचना सर्व सेक्टर अधिकारी तसेच पोलीस प्रभारींना देण्यात आल्या आहेत. रुद्रप्रयागमध्ये पडणारा पाऊस पाहता पौडी पोलिसांकडूनही केदारनाथ धामकडे जाणाऱ्या प्रवाशांना सध्या पुढे न जाण्यास सांगण्यात आले आले आहे.
प्रशासनाने सर्व सेक्टर दंडाधिकारी, पोलीस, डीडीआरएफ, एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि संबंधित विभागांना आपापल्या क्षेत्रात सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. कोणत्याही प्रकारची आपत्ती, मार्ग बंद होणे, भूस्खलन, अपघात किंवा इतर आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ जिल्हा आपत्कालीन परिचालन केंद्राला (DEOC) ८९५८७५७३३५, ८२१८३२६३८६ किंवा ११२ या संपर्क क्रमांकांवर माहिती देण्यास सांगण्यात आले आहे.



























































