नाटक सुरू थोडी शिस्त पाळूया!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दीपक करंजीकर

नाटक सुरू असताना मोबाईल सुरू ठेवावा / ठेवू नये. सूज्ञ प्रेक्षक आणि नाटय़ कलावंत… काही मतमतांतरे…

‘शांतता! नाटक सुरू आहे’ असं म्हणण्याची नुकतीच सुबोध भावे या लोकप्रिय अभिनेत्यावर वेळ आली. याआधी सुद्धा अनेक ज्येष्ठ, कनिष्ठ नटांनी नाटक सुरू असताना वाजणाऱया मोबाईल फोनच्या आवाजाबद्दल तक्रारी केल्या होत्या. सुबोध भावेंची समाजमाध्यमांवर आपली प्रतिक्रिया टाकल्यावर अनेक उलटसुलट मते नोंदवली गेली. बहुतांश रंगभूमीशी संबंधित व्यक्तींनी आणि प्रेक्षकांनीही मोबाईल बंद करून प्रेक्षागृहात जाणं हे दोघांसाठीही फायद्याचं आहे असं म्हटलंय. सार्वजनिक शिस्त पाळली तर परस्परपूरक वातावरण कोणत्याही समाजजीवनात निर्माण होऊ शकेल हे नक्की.

सामाजिक भान हवेच!

अगदी मान्य आहे आज नाटकाला येणारा वर्ग मध्यमवयीन, ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यातल्या अनेकांना फोन बंद करायचा कसा, हे पण माहीत नसतं किंवा विसरतात पण यालाही उपाय आहेत नं. फोन सायलेंटवर ठेवणं किंवा व्हॉटसऍप मेसेज करणं किंवा नेहमीच्या संपर्कातल्या व्यक्तींना मी या वेळेत नाटक बघायला गेलोय असा मेजेस करून ठेवणं असे उपाय आपण करू शकतो. नटाच्या दृष्टीनंच नाही तर मोबाईल बंद ठेवावा हा सार्वजनिक शिस्तीचा भाग आहे. प्रेक्षकांनी पैसे मोजलेत पण नटांनी वेळ दिलाय. ही इज ट्रान्सफॉर्मिंग हिमसेल्फ. तो त्या भूमिकेत शिरलेला असतो. एक्स्चेंज मीडिया लाईव्ह ट्रान्समिशन आहे. मालिका किंवा सिनेमा नाही, तो थांबून पण पाहता येतो. नाटक एक साधना आहे. नाटकाचा एक बाज आहे. त्यासाठी वातावरण निर्मितीची गरज असते आणि ती झाल्यावर अशा फोनमुळे वातावरण, नट सर्वच डिस्टर्ब होतात यात शंकाच नाही. त्यामुळे नाटकाचा प्रयोग हा म्युच्युअल रिस्पेक्टचा विषय आहे. दोघांनीही एकमेकांचा मान राखला पाहिजे. दोघांचीही सोय पाहिली पाहिजे. 

नाटकाचा पुरेपूर आनंद घ्या!

प्रेक्षक म्हणून माझं असं नक्कीच म्हणणं आहे की, फोन बंदच असायला हवेत. एखादं चांगलं नाटक सुरू आहे आणि मग्न होऊन आपण नाटक पाहत आहोत. अचानक शांततेमध्ये फोनचा आवाज घुमला तर एन्जॉयमेंट फॅक्टर तुटतो व तो परत यायला खूप वेळ लागतो. 2-3 तास स्टेजवर लाईव्ह अभिनय करणं कठीण आहे. कलाकाराला तेवढा रिस्पेक्ट दिलाच पाहिजे असं मला वाटतं. आपण पैसे मोजतो ते ती कलाकृती पाहण्याचे मोजतो. आपण कलाकाराला काही विकत घेत नाही आणि पैसे मोजलेत तर त्याचा पूरेपूर मोबदला आपणही घेऊया की? समाजात फिरताना काही अलिखित नियम असतात ते पाळायलाच हवेत. आपण स्वमर्जीने, करमणुकीकरता, प्रेक्षागारात जातो मग आपल्या पैशाचा पूरेपूर आनंदही आपण घ्यायचा असेल तर असे अडथळे नकोतच. सव्वा तास मोबाईल बंद ठेऊन आपण तो इंटरवलमध्ये पाहू शकतो. मेसेज करू शकतो. पण दोघांच्याही फायद्यासाठी मोबाईल बंद ठेवणं किंवा निदान सायलेंटवर ठेवणं ही आता गरजच आहे.

प्रत्येकाने आपले काम चोख करावे!

मोबाइल बंद ठेवणे हा निश्चितच प्रेक्षकांनी पाळायचा शिष्टाचार आहे. पण त्याचा इतका उहापोह करायची गरज आहे का? नाटक वेळेवर सुरु करावं, कलाकारांनी पूर्ण एनर्जीने काम करावं आणि तंत्रज्ञांनी त्यांचं काम चोख करावं. मोबाइल वाजल्यानंतर तो बंद न करणं, बोलत रहाणं तसेच मेसेज वाचत राहणं किंवा पाठवणं ही माझ्या मते नाटक हलल्याची लक्षणं असतात.

परस्पर सुसंवाद महत्त्वाचा

मी ज्येष्ठ नागरिक आहे. नाटकाला, गाण्याच्या कार्यक्रमाला जाते. ज्येष्ठांना खरंच बऱयाच वेळा मोबाईल बंद कसा करायचा? सायलेंट कसा करायचा? हे माहीत नसतं परंतु ते आजूबाजूच्या कोणाकडून तरी आत जायच्या आधीच सायलेंट का ठेऊ शकतात. घरी काही प्रॉब्लेम असेल व फोनची गरजच असेल तर व्हॉटस् ऍप मेसेज मिळू शकतात किंवा मध्यंतरात फोन चालू करून आपण फोन पाहू शकतो, बोलू शकतो.