
परळमधील मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात आणि भायखळा येथील नायर रुग्णालयात गेल्या दोन महिन्यांपासून सीटीस्कॅन मशीन्स बंद असल्यामुळे रुग्णांची प्रचंड गैरसोय होत असून नातेवाईकांना रुग्णालय बाहेरच्या खासगी डायग्नोसिस सेंटर्सकडून सीटीस्कॅन करून घ्यावे लागत आहे. त्यामुळे नातेवाईकांना नाहक आर्थिक भुर्दंड पडत आहे. दरम्यान, तातडीने सीटीस्कॅन मशीन सुरू करून रुग्णांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे.
मुंबई महापालिका शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज, रस्ते, पूल यासारख्या मूलभूत आणि नागरी सुविधा अत्यंत माफत दरात पुरवते. मुंबईसह देशभरातून येणाऱया लाखो रुग्णांवर महापालिकेच्या केईएम, शीव, नायर या प्रमुख तीन रुग्णालयांसह 16 सर्वसाधारण रुग्णालयांमध्ये अत्यंत माफक दरात आरोग्य सुविधा देते. केईएम आणि नायर रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण येत असतात. यात काही रुग्णांमधील वैद्यकीय गुंतागुंत अधिक सुस्पष्ट पद्धतीने सोडवण्यासाठी डॉक्टर त्यांना सीटीस्कॅन करायला सांगतात. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून केईएम आणि बी. वाय. एल. नायर रुग्णालयात सीटीस्कॅन बंद असल्यामुळे रुग्णांना रुग्णालयासमोरच्या डायग्नोसिस सेंटर्सकडून तीन ते साडेतीन हजार रुपये खर्च करून सीटीस्कॅन करून घ्यावे लागत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.
खासगी डायग्नोसिस सेंटर्सचे उखळ पांढरे
केईएममधील दोन सीटीस्कॅन मशीन्स बंद असल्यामुळे रुग्णालयासमोर असलेल्या डायग्नोसिस सेंटर्सकडून रुग्णांना सीटीस्कॅन करावे लागत आहे. पूर्वी या परिसरात असलेली एक खासगी सेंटर्सची संख्या आता 8 ते 10 सेंटर्सपर्यंत पोहोचली आहे. केईएममधील मशीन्स बंद असल्यामुळे या सेंटर्सचे उखळ पांढरे झाले आहे. दरम्यान, रुग्णालयातील मशीन्स खरंच बंद आहेत का, की या सेंटर्सबरोबर संगनमत करून आर्थिक फायद्यासाठी मशीन्समध्ये काही तांत्रिक बिघाड निर्माण करण्यात येत असावा, अशी शंका काही रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
बंद असलेल्या दोन सीटीस्कॅन मशीन्ससाठी नवीन टेंडरचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे एक ते दोन महिन्यांत नवीन मशीन्स येणार आहेत. तोपर्यंत बंद असलेल्या मशीन्सची दुरुस्ती केली जाणार आहे. लवकरात लवकर रुग्णांची गैरसोय दूर करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
– डॉ. नीलम अंद्राडे, संचालक, प्रमुख रुग्णालये
केईएम आणि नायर रुग्णालयामध्ये दररोज हजारो रुग्ण येत असतात. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते तर देशभरातून आलेल्या काही रुग्ण इतके गरीब असतात की, त्यांना रोजचे जेवण परवडत नाही. अशा परिस्थितीत नवीन सीटीस्कॅन मशीन्स आणून किंवा जुन्या मशीन्स तातडीने दुरुस्ती करून रुग्णांची गैरसोय दूर करावी.
– सुनील शिंदे, शिवसेना आमदार


























































