
केरळमधील एका जोडप्याने आर्थिक चणचण दूर करण्यासाठी दोन महिलांचा नरबळी दिल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. या प्रकरणातील आरोपी महिला व तिच्या पतीला तसेच एका दलालाला पोलिसांनी अटक केली आहे. मारण्यात आलेल्या दोन्ही महिलांना पॉर्न चित्रपटात काम करण्यासाठी लाखो रुपये मिळणार असल्याचे आमिष दाखवण्यात आले होते. त्या आमिषाला बळी पडून त्या दोघीही त्या जोडप्याच्या घरी आल्या होत्या. मात्र तिथे त्यांची गळा चिरून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली
सततची आर्थिक चणचण दूर करण्यासाठी एका जोडप्याने चक्क दोन महिलांचा नरबळी दिल्याची धक्कादायक घटना केरळमधील तिरुवनंतपुरम येथे घडली आहे. भगवल सिंह आणि लैला सिंह असे त्या दोघांचे नाव असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. भगवल व लैला या दोघांचे पठानमथिट्टा जिल्ह्यातील अरनमुला भागात मसाज पार्लर आहे. हे पार्लर चालत नसल्याने त्यांना कायम आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागत होते. त्यासाठी त्यांना एका साधूबाबाने नरबळी देण्याचा उपाय सुचवला होता. त्यासाठी त्यानी 1 सप्टेंबर व 27 सप्टेंबरला दोन महिलांचे बळी दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एर्नाकुलम भागातील एक महिला 1 सप्टेंबर पासून बेपत्ता होती तर दुसरी महिला 27 सप्टेंबर पासून त्याच भागातून बेपत्ता झाली. या दोघींचे कॉल रेकॉर्ड तपासले असता दोघींच्या फोनमध्ये शिहाब नावाच्या व्यक्तीचा फोन कॉमन असल्याचे आढळले. या प्रकरणी पोलिसांनी शिहाबला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याच्या माध्यमातून या दोन्ही पॉर्न फिल्मचे शूटींग करण्यासाठी शिहाबसोबत या जोडप्याच्या घरी गेल्या होत्या. शिहाबने त्यांना पॉर्न फिल्ममध्ये काम केल्याने लाखो रुपये मिळतील असे आमीष दाखवले होते.

























































