
पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 एप्रिलपासून दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात त्यांना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासारखेच मानवी बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देणारे पत्र समोर आल्याने खळबळ उडाली आहे. केरळचे भाजप अध्यक्ष के. सुरेंद्रन यांना हे पत्र मिळाले आहे.
सुरेंद्रन यांनी सांगितले, पंतप्रधानांबाबत आलेले धमकीचे पत्र मल्याळम भाषेत लिहिले असून पत्रात पाठवणाऱ्याचे नाव म्हणून कोची येथील रहिवासी एन. जे. जॉनी या व्यक्तीचे नाव लिहिले आहे. पोलिसांनी तत्काळ संबंधित व्यक्तीच्या घरी छापा टाकला, पण आपणाला सदरच्या पत्राबाबत काहीच माहिती नसल्याचे जॉनीने सांगितले. पत्रातील अक्षरही वेगळे आहे.
अहवाल लीक कसा झाला
मोदींच्या सुरक्षेशी संबंधित गुप्तचर अहवाल लीक करून पोलिसांनी गंभीर चूक केली आहे. त्याची चौकशी करावी अशी मागणी सुरेंद्रन यांनी केली आहे. लीक झालेला अहवाल 49 पानांचा असून त्यामध्ये कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांची नावे, पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचा तपशीलवार तक्ता इतर बाबी देण्यात आल्या आहेत.

























































