या राज्यात ‘गालगुंड’ साथीचे सावट, जाणून घ्या या आजाराची लक्षणे

कोविड-19 या संसर्गानंतर अनेक प्रकारच्या विषाणूंचा लोकांना सामना करावा लागत आहे. आता सध्या केरळमध्ये गालगुंड या संसर्गजन्य आजाराचे सावट पाहायला मिळत आहे. गेल्या दोन महिन्यात केरळमध्ये दोन हजारांहून अधिक लोकांना या संसर्गाची लागण झाली आहे. दरम्यान 10 मार्च रोजी 190 प्रकरणे नोंदवली गेली. गालगुड हा संसर्गजन्य आजार असून तो पॅरामिक्झो या विषाणूमुळे होतो. दरवर्षी याचे अनेक रुग्ण आढळतात. लहान मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त असते.

गालगुंड हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे तो कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो. यात सुरुवातीला ताप येणे, शरीर दुखणे, भूक लागणे, तोंडात जास्त प्रमाणात लाळ तयार होणे आणि चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंच्या पॅरोटीड ग्रंथींना सूज येणे ही या आजाराची लक्षणे आहेत. पॅरोटीड ग्रंथींच्या जळजळीमुळे कानाभोवती आणि तुमच्या जबड्याच्या बाजूला तीव्र वेदना होतात. त्यामुळे अन्न खाताना तुम्हाला त्रास होतो. ही लक्षणे सहसा संसर्गानंतर 16-18 दिवसांनी दिसतात. गालगुंडाने ग्रस्त असलेल्या काही लोकांमध्ये सर्दी आणि खोकला यासारख्या आजाराची सौम्य लक्षणे दिसतात.

गालगुंडची लक्षणे दिसू लागल्यानंतर लवकरात लवकर उपचार घेणे आवश्यक आहे. यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य त्या चाचण्या करून घेणे गरजेते आहे. लहान मुलांना गालगुंडपासून वाचण्यासाठी MMR हे वॅक्सीन दिले जाते आणि मोठ्यांना अँटीव्हायरल आणि वेदनाषमक औषधं दिली जातात. हा आजार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम अमेरिकेत 1967 मध्येच सुरू झाली. या आजारापासून बचाव करण्यासाठी हिंदुस्थानातही लस उपलब्ध आहे.

सध्या वाढत जाणाऱ्या या गंभीर संसर्गापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी MMR या लसीचे दोन डोस घेणे गरजेचे आहे. MMR लसीचा पहिला डोस मूल 12 ते 15 महिन्यांचे असताना आणि दुसरा डोस चार ते सहा वर्षांच्यादरम्यान दिला जातो.
आरोग्याच्या स्वच्छतेची काळजी न घेतल्याने लहान मुलांना या आजाराचा धोका अधिक असतो . विषाणूंद्वारे पसरणारा हा आजार झपाट्याने पसरतो आहे.