Wrestlers protest कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ खाप पंचायत मैदानात; दिल्लीकडे कूच, पोलीस सतर्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जंतरमंतरवर गेल्या 14 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ खाप पंचायत आणि शेतकरी संघटना मैदानात उतरल्या आहेत. खाप पंचायत आणि शेतकरी संघटनांनी दिल्लीत महापंचायतीची आयोजन केले आहे. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास ही पंचायत सुरू होणार असून यासाठी खाप पंचायत आणि शेतकरी संघटनेचे सदस्य दिल्लीकडे कूच करणार आहेत.

खाप पंचायत आणि शेतकरी संघटना शहरात घुसण्याच्या तयारीत असतानाच दिल्लीच्या बॉर्डरवर पोलीस अलर्ट मोडवर उभे आहेत. सोनीपत-दिल्ली-हरयाणा बॉर्डरवर पोलिसांचा मोठा फौजपाटा तैनात करण्यात आला आहे. येथे एसएसबीची बटालियनही तैनात करण्यात आली असून दिल्लीमध्ये प्रवेश करणाऱ्या गाड्यांची तपासणी सुरू आहे. तसेच सिंधू बॉर्डरवर बॅरिकेटींग करण्यात येत असून मातीने भरलेले डंपरही उभे करण्यात आले आहेत. शेतकरी संघटनेचे सदस्य ट्रॅक्टर घेऊन दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न करू लागले तर त्यांना रोखण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.

आंदोलक कुस्तीपटूंना पोलिसांची मारहाण, महिला खेळाडूंशी केले गैरवर्तन

महिलांना रोखलं

दरम्यान, कुस्तीपटूंना हरयाणासह पंजाबमधूनही मोठा पाठिंबा मिळत आहे. खेळाडुंच्या समर्थनार्थ अनेक महिला दिल्लीकडे रवाना झाल्या आहेत. बस आणि जीपमध्ये बसून या महिला दिल्लीकडे कूच करत असून त्यांना टिकरी बॉर्डरवर अडवण्यात आले आहे. पोलिसांनी ताफा अडवल्यानंतर महिला आणि शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलीस तपासणीनंतर महिलांची गाडी पुढे सोडण्यात आली. या महिला शेतकरी संघटनेच्या सदस्य असून त्या आपल्यासोबत जेवण बनवण्याचे साहित्यही घेऊन आल्या आहेत. दिल्लीत प्रवेश केल्यानंतर त्या थेट कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ जंतरमंतरवर जाणार आहेत.

खेळाडुंचे आवाहन

भाजप खासदार आणि राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंपैकी एक बजरंग पुनिया यांनी खाप पंचायतींना पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर अनेक खाप पंचायती सक्रिय झाल्या आणि बैठकांचा जोर वाढला. बैठकीनंतर खाप पंचायतींना जंतपमंतरवर जाण्याचा निर्णय घेतला.

…तर पदके अन् पुरस्कार परत करू!

राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचे आरोप करीत आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू दिल्लीत आंदोलनाला बसल्या आहेत. बुधवारी रात्री पोलिसांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांनी केला. यामध्ये काही कुस्तीपटू जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर निराश झालेल्या कुस्तीपटूंनी देशासाठी खेळताना मिळालेली पदके आणि पुरस्कार आम्ही परत करू, असा थेट इशारा सरकारला दिला आहे.

कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला, ‘पदकविजेत्या खेळाडूंना रस्त्यावर मारले जात आहे. जर आमच्या पदकांचा हाच सन्मान असेल तर ही पदके आमच्या काय कामाची? त्यामुळे ही पदके आम्ही सरकारला परत करून सामान्य जीवन जगू. पोलीस धक्काबुक्की करतात, शिवीगाळ करतात, तेव्हा त्यांना कळत नाही की, हे ‘पद्मश्री’ पुरस्कार विजेते खेळाडू आहेत. केवळ मीच नाही, साक्षी मलिकही ‘पद्मश्री’ आहे. पोलिसांनीच या पुरस्काराची लाज ठेवली नाही. त्यामुळे हे पुरस्कार सरकारला परत केलेले बरे,’ असा पवित्रा आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी घेतला आहे.