पुढची निवडणूक मोदी विरुद्ध हिंदुस्थान! ममतांनी ललकारले

संपूर्ण देशात ‘खेला होबे’ होईल. पुढची लोकसभा निवडणूक मोदी विरुद्ध हिंदुस्थान अशी होईल असे तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला ललकारले आहे. पेगॅसस प्रकरणाची चर्चा संसदेत नाही, तर चाय पर होणार का, असा सवाल करीत त्यांनी फटकारले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पाच दिवसांच्या दिल्ली दौऱयावर आहेत. विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या त्या भेटीगाठी घेत आहेत. बुधवारी ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची  भेट घेतली. सुमारे तासभर त्यांच्यात चर्चा झाली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते. यानंतर पत्रकारांशी त्या बोलत होत्या.

आगामी 2024 ची सार्वत्रिक निवडणूक ही मोदी विरुद्ध हिंदुस्थान अशी असेल असे त्या म्हणाल्या. विरोधकांच्या एकजुटीचे नेतृत्व करणार का? या प्रश्नावर त्यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. मी काही राजकीय भविष्यवेत्ता नाही. तेव्हाच्या स्थितीवर अवलंबून आहे. राजकारणात समीकरणे बदलत असतात. मी नेता नाही, तर रस्त्यावर संघर्ष करणारी कार्यकर्ता आहे. मात्र, भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे आहे असे सांगितले.

 

आपली प्रतिक्रिया द्या