
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी बिगर कश्मिरींच्या टार्गेट किलिंगचे सत्रच सुरू केले आहे. गेल्या काही दिवसांत 11 जणांच्या निर्घृण हत्या लश्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी केल्या आहेत. वेचून परप्रांतीयांना लक्ष्य करण्याच्या या मोहिमेमुळे रोजगारासाठी गेलेल्या परप्रांतीय कामगारांनी मोठय़ा संख्येने जम्मू-कश्मीरातून पलायनाला सुरुवात केली आहे. काही कामगार तर दिवाळीआधीच आपल्या घरी परतण्याची तयारी करताना दिसत आहेत.
कश्मीर खोऱ्यात दहशतवादी टोळ्या कश्मिरी आणि बिगर कश्मिरी यांची ओळख पटवून निष्पाप परप्रांतीयांचे बळी घेत आहेत. गेल्या काही दिवसांत 9 परप्रांतीय कामगारांना घरात घुसून गोळ्या घालून ठार करण्याचे पाप दहशतवाद्यांनी केले आहे. त्यामुळे कश्मीरातील दहशतवादी टोळ्यांविरोधात देशभरात संतापाचे वातावरण आहे. त्यातच आता आपला जीव वाचवण्यासाठी उत्तर प्रदेश, राजस्थान, बंगाल, मध्य प्रदेश आणि बिहारमधून रोजगारासाठी कश्मीर खोऱ्यात आलेल्या अनेक परप्रांतीय कामगारांनी आपला बाडबिस्तरा गुंडाळून घरी परतण्याची तयारी जोरात सुरू केली आहे. टार्गेट किलिंगची एवढी दहशत परप्रांतीयांच्या मनात आहे की, ते गटागटाने आपल्या घरी परतण्यासाठी श्रीनगर व अन्य रेल्वेस्थानकांसह विविध बस स्टॅण्डवर येताना दिसत आहेत.
- कश्मीर खोऱ्यात गैरकश्मिरींचे टार्गेट किलिंग करणाऱ्या दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी केंद्राने लष्कराची विशेष ऑपरेशन टीम कश्मीर खोऱ्यात पाठवली आहे. ही टीम परप्रांतीय कामगारांचे दहशतवाद्यांपासून रक्षण करणार आहे.
…तर 15 दिवस कश्मीर बिहारींकडे द्या; जीतनराम मांझी यांचे केंद्राला आव्हान
जम्मू -कश्मीरची परिस्थिती हाताबाहेर जात असेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना त्यावर नियंत्रण मिळवता येत नसेल तर फक्त 15 दिवस कश्मीर बिहारींच्या हाती द्या, आम्ही सुधारून दाखवतो, असे संतप्त आव्हान बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी केंद्र सरकारला दिले आहे. कुलगाममधील बिहारींचे रक्त सांडणाऱ्या दहशतवाद्यांना आम्ही बिहारी स्टाइलने धडा शिकवू , असे मांझी पुढे म्हणाले.



























































