आवाजाची गुणवत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

ज्या पद्धतीने आपण आपल्या शरीराला तंदुरुस्त बनवण्यासाठी व्यायामशाळेत जाऊन आपल्या हाताचे, पायाचे व्यायाम करत असतो अगदी त्याच पद्धतीने आवाजाची तब्येत चांगली करण्यासाठीसुद्धा काही महत्त्वाचे व्यायाम असतात.

बऱ्याच लोकांना सिनेअभिनेत्यांच्या गहिऱया आवाजाबद्दल प्रचंड आकर्षण असते आणि आपला आवाजदेखील तसाच गहिरा, मजबूत किंवा मधाळ व्हावा असे अपेक्षित असते.

आवाज ही आपल्याला मिळालेली नैसर्गिक देणगी आहे, परंतु योग्य प्रकारचे व्यायाम करून आपण त्याची तब्येत चांगली करू शकतो हे मात्र नक्की.

आपल्या आवाजाची तब्येत ही संपूर्णतः आपल्या गळय़ातील वोकल कॉर्डस् म्हणजेच स्वरयंत्रावर अवलंबून असते. सुप्रसिद्ध गायक तसेच अभिनय क्षेत्रात काम करणाऱयांना आणि ज्यांचे करीअर हे आवाजावर अवलंबून असते त्या सर्व व्यक्तींना आपल्या स्वरयंत्राची काळजी घेणे अतिशय गरजेचे असते.

वेगवेगळय़ा पद्धतीच्या व्यायामाने आवाजातला जाडपणा, पातळपणा तुम्ही कमी-जास्त करू शकता. जसे की, मुद्दामहून अधिकार वाणीत बोलणे. ज्यात मंद्र सप्तकातील आवाजातून म्हणजेच गहिऱया आवाजाने बोलण्याचा सराव तुम्ही करायला हवा. याचप्रमाणे तुम्हाला एखाद्या दूर असलेल्या माणसाला आपण ज्या पद्धतीने हाक मारतो, त्या पद्धतीने मोठय़ाने ओरडून बोलून आपल्याला आपल्या आवाजाची उंची वाढवता येते. कधी कधी ऍम्बुलन्सचा किंवा पोलिसांच्या गाडीच्या सायरनचा आवाज ज्या पद्धतीने असतो त्याचे अनुकरण करून आपल्या गळय़ातून तसा आवाज काढल्यामुळे स्वरयंत्राचा उत्तम व्यायाम होतो.

आपण मुद्दामहून आवाजाचा व्यायाम करणे. आपल्याला शक्य नसल्यामुळे अशा पद्धतीचे व्यायाम आपण आंघोळ करताना, ड्राइव्ह करताना किंवा एकटे असताना नक्कीच करू शकतो. आजूबाजूच्यांना या पद्धतीच्या व्यायामाचा त्रास होऊ नये याकरिता आपण आपले तोंड उशीत खुपसून अशा पद्धतीचा व्यायाम करू शकतो.

योगासनांच्या माध्यमातून कपालभारती केल्याने आपल्याला पोटातून श्वास घेण्याची कला अवगत होते आणि त्यामुळे आपल्या आवाजाचा दर्जा वाढतो. आपण बोलत असताना गळय़ातून, नाकातून किंवा पोटातून बोलत आहोत का, याचे निरीक्षण करावे. जे लोक पोटातून बोलतात त्यांचा आवाज गहिरा असतो. असा धीरगंभीर आवाज काढण्यासाठी तुम्हाला ताठ बसून बोलण्याची सवय अंगीकारायला हवी.

सुरुवातीला एक-एक शब्द त्यानंतर वाक्य आणि त्यानंतर मोठमोठे उतारे या पद्धतीच्या आवाजात मोठय़ाने बोलून तुमच्या आवाजाची तब्येत तुम्ही चांगली करू शकता.

आवाज गहिरा किंवा पातळ करण्यासाठी तुम्ही केलेल्या व्यायामाचा तुमच्या स्वरयंत्रावर अपेक्षेपेक्षा जास्त ताण येणार नाही याची योग्य दक्षता आपण घेऊन जर नित्यनेमाने हा सराव निदान दोन आठवडे केला, तर तुम्हाला अपेक्षित आवाज नक्कीच प्राप्त होतो. तुमच्या आवाजामुळे समोरच्यावर आपली जगावेगळी छाप तुम्ही पडू शकता. म्हणूनच आवाजाची काळजी घेऊन त्याला नियमित योग्य व्यायाम देऊन त्याचे संवर्धन करावे.

>> किरण खोत (निवेदक, सूत्रसंचालक)