
‘विक्रांत वाचवा’ या मोहिमेच्या नावाखाली ‘क्राऊड फंडिंग’ करत भाजपच्या किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी निधी गोळा केला. राजभवनच्या नावे बँक खात नसल्याने हा निधी पक्षाला दिल्याचा दावा सोमय्या यांच्या वकिलांनी आज सत्र न्यायालयात केला. त्यावर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी, पैसे पक्षाला दिले म्हणता मग कुणाला दिले त्या नेत्याचे नाव सांगा, त्यांनी त्या पैशांचा वापर मग केला कुठे, असा जोरदार युक्तिवाद करत सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनाला विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. यामुळे बाप-बेटे जेलमध्ये जाणार हे निश्चित झाले आहे.
विक्रांत वाचवाच्या नावाखाली सोमय्या पितापुत्रांनी कोटय़वधी रुपयांचा निधी गोळा करत अपहार केल्याचा भांडाफोड शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. विक्रांतसाठी गोळा करण्यात येणारा निधी राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले होते. मात्र, असा कोणताही निधी त्यांनी राजभवनात जमा केलेला नसल्याचे माहिती अधिकारात दिलेल्या माहितीवरून उघड झाले आहे. ‘विक्रांत’च्या नावाखाली निधी गोळा करून 58 कोटी रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस येताच माजी सैनिक बबन भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमय्या पितापुत्रांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अटक होण्याच्या भीतीने सोमय्या पितापुत्र गायब झाले असून अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव सुरू केली आहे.
किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी सोमय्या यांचे वकील अशोक मुंदर्गी यांनी गोळा करण्यात आलेला निधी आम्ही राजभवनाच्या खात्यामध्ये जमा करण्यास गेलो होतो मात्र, बँकेमध्ये राजभवनाच्या नावाने कोणतेही खाते नसल्याने हे पैसे पक्षाला देण्यात आल्याचा युक्तिवाद केला.
सोमय्या यांच्या वतीने करण्यात आलेल्या युक्तिवादास सरकारी वकील प्रदीप घरत यांनी जोरदार आक्षेप घेतला. सोमय्या हे एका राजकीय पार्टीचे नेते आहेत. त्या पैशांचा वापर मग केला कुठे? त्यांनी तो निधी पक्षाला दिला असेल तर कुणाला दिला त्या नेत्याचे नाव सांगा., त्यांच्यावरही कारवाई करावी लागेल, असे ते म्हणाले.
अटक टाळण्यासाठी धडपड
‘आयएनएस विक्रांत’ निधी अपहारप्रकरणी भाजपचे सोमय्या पितापुत्र चांगलेच अडचणीत आले आहेत. किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्याने त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. तर नील सोमय्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान, किरीट सोमय्यांच्या वकिलांनी जामीनासाठी उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे म्हटले आहे.
सोमय्या यांचे म्हणणे काय?
सत्र न्यायालयात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या वतीने ज्येष्ठ कॉन्सिल अशोक मुंदर्गी यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायाधीशांना सांगितले की, निधी उभारणी 2013 साली झाली. पण याप्रकरणी 9 वर्षांनी केस नोंदवण्यात आली. निधी दिला पण पैशाची पावती देण्यात आली नाही म्हणून लष्कराच्या माजी अधिकाऱयाने ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. विक्रांतसाठी केवळ भाजपनेच निधी गोळा केला नाही, तर इतर पक्षांनीही पैसे गोळा केले. हा कार्यक्रम राजकीय पक्षाचा होता. निधीचा वापर कसा आणि कुठे करायचा याच्याशी सोमय्या यांचे काहीही घेणेदेणे नाही. पावती न मिळाल्याचा आक्षेप तक्रारदाराने 2022 मध्ये घेतला. त्यापूर्वी हा आक्षेप घ्यायला हवा होता. राजकीय हेतू साधण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारी पक्षाचा युक्तिवाद
राज्य सरकारच्या वतीने अॅड. प्रदीप घरत यांनी युक्तिवाद करताना सोमय्या यांचा दावा फेटाळून लावला. त्यांनी बाजू मांडताना सांगितले की, मीडिया रिपोर्ट्सच्या आधारे तक्रारदाराने तक्रार दाखल केली असली तरी दोन्ही आरोपी निधी गोळा करण्यासाठी मुंबईत फिरत होते यात तथ्य आहे. त्यामुळी हा निधी गोळा केल्याप्रकरणी आरोपींची तुरुंगात चौकशी होणे आवश्यक आहे. ही रक्कम विक्रांतसाठी वापरण्यात येईल या अनुषंगाने जमा केली होती. पण ही रक्कम इतर कामासाठी वापरली गेली असेल तर हा कायदेशीर गुन्हा होतो. हा निधी विक्रांत नौकेसाठी वापरला गेलाच नाही तर हे पैसे कशासाठी वापरले याचा शोध घेणे आवश्यक आहे.
सोमय्या यांनी त्यांच्या जामीन अर्जासोबत जी कागदपत्रे सादर केली आहेत त्या कागदपत्रांमधून पैसे गोळा केल्याचा गुन्हा कबूलच केला आहे. दोन्ही आरोपी ‘सेव्ह विक्रांत’ असा उल्लेख असलेले टी-शर्ट घालून पैसा गोळा करत असल्याचे फोटो उपलब्ध आहेत. त्यांनी साडे अकरा हजार गोळा केल्याचं सांगितलं. ही रक्कम लहान असली तरी अपहार हा अपहार असतो. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई होईल.
– अॅड. प्रदीप घरत, सरकारी वकील



























































