तुमचा खेळ होतो… आमचा मात्र जीव जातो! मुंबईत पथनाट्यातून पक्षी वाचवण्याचा संदेश

मकरसंक्रांतीला दरवर्षी विविधरंगी पतंगांनी आकाश व्यापलेले पाहायला मिळते. पतंगप्रेमींचा खेळ होत असला तरी नायलॉनच्या धारदार मांजामध्ये आणि प्लॅस्टिकच्या पतंगांमध्ये अडकून दरवर्षी शेकडो पक्षी जखमी होतात, मृत्युमुखी पावतात. या पार्श्वभूमीकर मुक्या पक्ष्यांना वाचवण्यासाठी पक्षीप्रेमींनी पुढाकार घेतला असून शहरात पथनाट्याद्वारे ’पतंग उडवू नवा, पक्षी वाचवा’ असा संदेश देण्यात आला.

पक्षीप्रेमी आणि समाजसेवक अशोक कुर्मी यांच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून वडाळ्याचे फाईव्ह गार्डन, सायन सर्कल आणि ऍन्टॉप हिल या ठिकाणी पथनाट्याचे आयोजन केले होते. या पथनाट्यात बच्चेकंपनींचा सहभाग होता.

चिमणी, कावळा अशा पक्षांच्या रूपात बच्चे कंपनीला दाखवण्यात आले होते. त्याद्वारे हा खास संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यात आला. याबाबत अशोक कुर्मी म्हणाले, मकरसंक्रांतीला दरवर्षी शेकडो पक्षी मांजात अडकून जखमी होतात. त्यातच बर्ड फ्लूचे संकट आता पक्ष्यांवर कोसळले आहे. गतवर्षी दीडशे पतंगांवर ‘से नो टू काईट्स, सेव्ह बर्ड’ असा संदेश लिहून बेस्ट बससह फुटपाथवर ठिकठिकाणी लावल्या होत्या. यंदा पथनाट्यातून जनजागृती केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या