
महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात येण्याचे आव्हान देण्याचा खुळचटपणा करणाऱ्या कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचा आज सर्वच स्तरांतून निषेध करण्यात आला. शिवसैनिकांनी कर्नाटकाच्या सीमेवर सवदी यांच्या पुतळ्याचे दहन करून कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.
सवदी यांचे आव्हान स्वीकारत, जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी आज दुपारी थेट सीमा भागात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, कागल चेकपोस्ट नाक्याजवळ सीमारेषेवर कानडी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा शिवसैनिकांनी सवदी यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त केला.




























































