
कानडी सक्तीकरणासह मराठी भाषिकांवर होत असलेला अत्याचार तसेच दडपशाहीच्या जोरावर महामेळावा चिरडणाऱया कर्नाटक सरकार आणि पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवारी (दि. 26) कोल्हापुरात एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
यावेळी कोल्हापूर जिल्हाधिकाऱयांमार्फत पंतप्रधानांना पत्र लिहून कर्नाटकचा जुलूम थांबविण्याची मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी दिली.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची आज बेळगावातील मराठा मंदिरच्या सभागृहात बैठक झाली. कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत धरणे आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.


























































