कोल्हापुरात संततधार; पंचगंगेसह सर्वच नद्या पात्राबाहेर पडण्याच्या मार्गावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ वगळता राधानगरी, भुदरगड, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यांसह धरणक्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, येथे सर्वाधिक 190 मि.मी. पावसाची नोंद झाली. पंचगंगेसह सर्व नद्यांच्या पाणीपातळीत 8 ते 10 फुटांची वाढ होऊन पाणी कोणत्याही क्षणी पात्राबाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील 20 बंधारे पाण्याखाली गेले होते. शहरातही दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. दरम्यान, हवामान विभागाने पुढील दोन-तीन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

गेल्या आठवडय़ापासून जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पाऊस कोसळत असून, दोन दिवसांपासून सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. काल दिवसभर शिरोळ वगळता सर्व तालुक्यांत संततधार पाऊस झाला. तीन ठिकाणी अंशतः पडझड झालेल्या घरांची संख्या वगळता, जिल्ह्यात कोठेही जीवित वा वित्तहानी झालेली नाही.

‘जिल्ह्याची चेरापुंजी’ अशी ओळख असलेल्या गगनबावडा तालुक्यात काल दिवसभरात सर्वाधिक 190.8 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली. आज सकाळी 11पर्यंतच्या 24 तासांत हातकणंगले तालुक्यात 20.1, शिरोळ 8.1, पन्हाळा 64.1, शाहूवाडी 75.6, राधानगरी 87.2, करवीर 52.5, कागल 58, गडहिंग्लज 24.4, भुदरगड 59.8, आजरा 33.4 आणि चंदगड तालुक्यात 34.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

राधानगरी धरणात सध्या 75.04 दलघमी पाणीसाठा असून, धरणातून एक हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातून 14 हजार 152, तर कर्नाटकातील अलमट्टी धरणातून 12 हजार 684 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणात 31.69, तुळशी 41.58, वारणा 33.29, दूधगंगा 27.84, कासारी 38.39, कडवी 33.66, कुंभी 42.22, पाटगाव 37.37, चिकोत्रा 45.08, चित्री 32.66, जंगमहट्टी 41, घटप्रभा 72.37, जांबरे 38.14, आंबेओहोळ 53.53 आणि कोदे प्रकल्पात 57.76 टक्के साठा आहे.

20 बंधारे पाण्याखाली

दुपारपर्यंत जिल्ह्यात 14 बंधारे पाण्याखाली गेले होते. सायंकाळी ही संख्या 20वर गेली असून, रात्री आणखी बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड; भोगावती नदीवरील हळदी व सरकारी कोगे; कासारी नदीवरील वालोली, यवलूज, पुनाळ, तिरपण, ठाणे आळवे; कुंभी नदीवरील मांडुकली व शेणवडे हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

नद्यांच्या पातळीत 8 ते 10 फुटांनी वाढ

धरणक्षेत्रात पावसाचा जोर आणि सर्वत्र होत असलेल्या संततधार व धुवाँधार पावसामुळे गेल्या आठवडय़ात तळ गाठलेल्या नद्यांच्या पातळीत झपाटय़ाने वाढ झाली आहे. दोन दिवसांत झालेल्या पावसाने, तसेच राधानगरी धरणातून होत असलेल्या एक हजार क्युसेकच्या विसर्गामुळे नद्यांच्या पातळीत 8 ते 10 फुटांनी वाढ झाली आहे. रविवारी सकाळी सातच्या सुमारास 15.4 फुटांवर असलेली पंचगंगा नदीची पातळी 24 तासांत 23.7 फुटांवर पोहोचली होती. एका रात्रीत सात फुटांनी वाढ झाली आहे. तर, आज दुपारी चारच्या सुमारास ही पातळी 26.6 फुटांवर पोहोचली होती. पंचगंगेसह सर्व नद्यांचे पाणी पात्रालगत असून, कोणत्याही क्षणी पात्राबाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणीपातळी मोजली जाते. यानुसार 39 फूट इशारा आणि 43 फूट धोकापातळी आहे.

बर्की धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका

वर्षापर्यटनासाठी शाहूवाडी तालुक्यातील प्रसिद्ध बर्की धबधबा पाहण्यास आलेले 70 ते 80 पर्यटक कासारी नदीच्या पुलावर पाणी आल्याने वाहनांसह अडकून पडले होते. रात्री उशिरा पुलावरील पाणी कमी झाल्याने त्यांची सुटका झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, सध्या अतिवृष्टीचा इशारा मिळाला असून, पावसाचा जोर वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पर्यटकांनी सुरक्षेचा उपाय म्हणून बर्की धबधब्यासह जिल्ह्यातील इतर सर्व धबधब्यांच्या ठिकाणी वर्षासहलीला जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.