
सामना प्रतिनिधी । कोल्हापूर
शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या हलगर्जीपणातून सर्जिकल ब्लेड शरीरातच राहिल्याने एका तरुणाला जीवाला मुकावे लागले. वसीम असलम गजबर (30, रा. एस.टी. कॉलनी, राजारामपुरी) असे या तरुणाचे नाव आहे. कदमवाडी येथील ऍपल-सरस्वती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हा गंभीर प्रकार घडला.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच वसीमचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संबंधित डॉक्टरांवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा संतप्त नातेवाईकांनी घेतला. या हॉस्पिटलविरोधात तक्रार दाखल करून घेण्यासही शाहूपुरी पोलिसांकडून तांत्रिक अडचण पुढे करण्यात येत असल्याने, वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले होते.
अखेर लेखी तक्रार अर्ज दिल्यानंतर तसेच इन कॅमेरा शवविच्छेदन करून कारवाईच्या आश्वासनानंतरच नातेवाईकांकडून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. वसीम गजबर हा कुटुंबीयांसह राजारामपुरी येथील एसटी कॉलनीत राहायचा.पांजरपोळ येथे त्याचा स्वतःचा ऑटो इलेक्ट्रिशियनचा व्यवसाय आहे. गेल्या दोन वर्षांपासून कर्करोगामुळे त्याच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी छातीत दुखून धाप वाढल्याने त्याला उपचारासाठी कदमवाडी येथील ऍपल सरस्वती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. फुफ्फुसातील हवा बाहेर काढण्यासाठी छोटी शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगून, डॉक्टरांनी गुरुवारी सायंकाळी त्याची शस्त्रक्रिया केली. यावेळी डॉक्टरांच्या हलगर्जीपणातून वापरलेले एक सर्जिकल ब्लेड वसीमच्या शरीरातच राहिले. डॉक्टरांमध्ये याची झालेली चर्चा ऐकून वसीमने चुलते सलीम गजबर यांना हा प्रकार सांगितला होता.




























































