
कोरोना संसर्गाच्या दुसऱया लाटेचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत राज्यात बुधवारी रात्री आठ नंतर 1 मे पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात याची कडक अंमलबजावणी सुरू झाली असून, अत्यावश्यक व सार्वजनिक सेवा वगळता दैनंदिन सर्व व्यवहार आणि वर्दळ ठप्प झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कोल्हापूरकरांनी घरातच राहणे पसंत केले.
बुधवारी रात्रीपासून संचारबंदी लागू होताच, सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. शहरातील प्रमुख रस्ते, चौकात, तालुक्यातील महत्त्वाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. बंदोबस्तावरील सुमारे अडीच हजारहून अधिक पोलिसांनी बॅरिकेड्सद्वारे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी तसेच चौकशी सुरू केली. विनाकारण घराबाहेर फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. अशा नागरिकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिला असला तरी काही ठिकाणी पोलीस मवाळ भूमिका घेत कारवाई करीत नसल्याचेही दिसून येत होते. रात्रीपासूनच बहुतांशी व्यापारपेठा आणि व्यावसायिकांनी स्वतःहून दुकाने बंद केली. पोलीस तसेच महापालिकेच्या फिरत्या पथकांकडून नागरिकांना संचारबंदीचे आवाहन करण्यात येत होते.
राज्य शासनाच्या सूचनेनुसार अत्यावश्यक आणि सार्वजनिक सेवा सुरूच राहिल्या. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांसाठी एसटी आणि केएमटी बस अशी मोजकीच सार्वजनिक वाहने सुरू राहिली. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात नागरिकांची तुरळक वर्दळ होती. प्रवाशांविना रिक्षाचालकांना वाट पाहावी लागत होती.
मजुरांचे स्थलांतर लॉकडाऊनच्या भीतीने नाही
गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजुरांना प्रसंगी पायपीट करत शेकडो मैल अंतरावरील घर गाठावे लागले होते. आता कोरोना संसर्गाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्यात पंधरा दिवस संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे काही परप्रांतीय मंजूर लॉकडाऊनच्या भीतीने येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्मिनसमधून आपापल्या राज्यात परत निघाल्याचे दाखविण्यात येत असले तरी प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. हाताच्या बोटावर मोजता येणारे हे मजूर राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यांतील असून, लॉकडाऊनच्या भीतीने नव्हे, तर दरवर्षीप्रमाणे गावी जात असल्याचे बहुतांश मजुरांनी सांगितले.




























































