कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिर सोमवारपासून खुले, मात्र गाभाऱ्यातून दर्शन नाहीच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिर सोमवारपासून खुले, मात्र गाभाऱ्यातून दर्शन नाहीच

गेल्या सात ते आठ महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील मंदिरे दीपावली पाडव्याच्या मुहुर्तावर भक्तांना दर्शना- साठी खुली होत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेताना, सर्व प्रार्थना -स्थळांमध्ये शिस्त पाळण्याचे आवाहन सर्वांना केले आहे.त्यानुसार साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपुर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्रीअंबाबाई, दख्खनचा राजा श्रीजोतिबा मंदिराचेही दरवाजे उद्या पासुन,नियमावलीतच खुले होत आहेत. तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती अंतर्गत कोल्हापूर,सांगली,सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांतील 3 हजार 42 मंदिरेही खुली होत आहेत.

श्रीअंबाबाई मंदिरात सहा-सहा फुटांचे अंतर ठेऊन,चारपैकी पुर्व दरवाजातुन 20 ते 25 भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. ठराविक अंतराने दुस-या 20-25 भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे. दर्शनानंतर दक्षिण दरवाजातुन भाविकांना बाहेर जाता येणार आहे. तर मंदिरात सुरवातीस पितळी उंब-यापासुन कासव चौकातूनच देवीचे दर्शन मिळणार आहे. त्यामुळे मूर्तीच्या जवळ जाऊन दर्शन घेता येणार नाही.सध्या कोणालाही गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येणार नाही.

देशभरातून भाविक येण्याची शक्यता असल्याने, दर्शनास येणा-या प्रत्येक भाविकांना तापमापकाने तपासण्यात येणार आहे.सॅनिटायझर व मास्क लावुनच प्रवेश देण्यात येणार आहे. मंदिरात इतर परिसरात भक्तांना फिरता येणार नाही.मंदिरातील सर्व दुकानेसुद्धा बंदच ठेवण्यात येणार आहेत.

मोफत ऑनलाईन बुकिंगची चार दिवसात सुविधा

भक्त मोठ्या संख्येने येण्याची शक्यता असल्याने, तसेच गैरसोय होऊ नये म्हणून दर्शनासाठी मोफत ऑनलाईन बुकिंगची सुद्धा व्यवस्था करण्यात येणार आहे.अजुनही कोरोनाचा धोका टळलेला नाही.त्यामुळे जेष्ठ नागरिक,गरोदर महिला आणि दहा वर्षांखालील मुलांनी मंदिरात येण्याचे टाळावे.तसेच परगावाहुन येणाऱ्या भाविकांनी संपर्क साधुनच यावे असे आवाहन देवस्थान व्यवस्थापन समिती कडुन करण्यात आले आहे.

दिवसभरात २ ते ३ हजार भाविकांना दर्शनाचे नियोजन

तुर्त दिवसभरात २ ते ३ हजार भाविकांना देवीचे दर्शन घेता येईल असे नियोजन करण्यात आले आहे.गर्दी टाळण्यासाठी सकाळी ९ ते १२ आणि सायंकाळी ४ ते ७ या वेळेत भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे.गेल्या ७ महिन्यात मंदिर प्रशासनातील एकाही कर्मचारी,पुजाऱ्याला सुदैवाने कोरोनाची लागण झालेली नाही.

कोरोना योद्ध्यांना प्रथम दर्शन

मंदिरे दर्शनासाठी खुली होत असल्याने,प्रथम कोरोना योद्ध्यांना देवीचे दर्शन देण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.कोरोना काळात सेवा बजावलेले डाॅक्टर,पोलिस,आरोग्य कर्मचारी, आशा कर्मचारी अशा कोरोना योद्धयांनी प्रथम दर्शन घ्यावे असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दैनिक सामनाशी बोलताना केले आहे.