
‘खिळेमुक्त झाडांचे कोल्हापूर’ अशी विशेष मोहीम आता एनजीओ आणि लोकसहभागातून राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून शहरातील सुमारे साडेपाच लाख झाडांपैकी पहिल्या टप्प्यात सुमारे एक लाख झाडांवर वर्षानुवर्षे ठोकलेले खिळे आणि जाहिराती फलक हटविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली. नवीन वर्षात पहिल्याच रविवारी (दि.3 जानेवारी) शहरात ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, पर्यावरण अभ्यासक डॉ. अमर आडके, उदय गायकवाड, अनिल चौगुले यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
झाडांनासुद्धा जीव असतो; पण जाहिरातीच्या फलकांसह अनेक कारणांनी झाडांवर खिळे ठोकण्यात आल्याचे दिसून येते. वर्षानुवर्षे अशा खिळे ठोकलेल्या अवस्थेतील झाडांना खिळेमुक्त करण्याची संकल्पना पुणे येथील एका सामाजिक संस्थेच्या प्रेरणेतून सूचल्याने, ‘खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर’ ही मोहीम शहरात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील सुमारे 40 ते 50हून अधिक विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने यासाठी नियोजन करण्यात येत आहे. ही मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले.
वृक्षगणनेतील आकडेवारीनुसार शहरात 5 लाख 67 हजार 87 इतकी नोंदणीकृत झाडे आहेत. पहिल्या टप्प्यात 1 लाख झाडांचे खिळे काढण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या गार्डन विभागाची मदत घेऊन सामाजिक संस्थांना विभाग नेमून देण्यात येणार आहेत. या मोहिमेत सामील होण्यासाठी नागरिकांनी 9022909599 या क्रमांकावर सहभाग नोंदवावा, असे आवाहनही पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
दरम्यान, वृक्षसंवर्धन कायद्यांतर्गत दंडाची तरतूद अधिक कडक करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.




























































