
उजळाईवाडी विमानतळाचे सुरक्षा अधिकारी पोलीस निरीक्षक प्रदीप काळे हे आज वारणा नदी पुलाजवळ घुणकी येथे बेशुद्धावस्थेत मिळून आले. तत्पूर्वी पोलीस अधिकाऱयांच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर त्यांनी आत्महत्या करत असल्याचा मेसेज पाठविल्याचे समोर आले आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दुपारी तातडीने याप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. मात्र, पोलीस निरीक्षक काळे यांचा वैद्यकीय अहवाल तसेच जबाबानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
पोलीस निरीक्षक काळे हे यापूर्वी पेठवडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची उजळाईवाडी विमानतळाचे सुरक्षा अधिकारी म्हणून तडकाफडकी बदली झाली होती. तपासकामासाठी बाहेर जात असल्याचे सांगून ते रात्री घरातून बाहेर पडले होते. मात्र, जिह्यातील पोलीस अधिकाऱयांच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱयांच्या त्रासातून आत्महत्या करीत असल्याचा मेसेज केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा मोबाईलवरून माग काढण्याचा प्रयत्न केला असता, आज सकाळी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील घुणकी येथील वारणा नदीजवळ ते बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांनी झोपेच्या गोळ्या अधिक सेवन केल्याचे सांगण्यात येत होते. त्यांना तत्काळ कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात दाखल करून नंतर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याने जबाब नोंदविता आला नाही.
दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सोशल मीडियाद्वारे असा कोणताही प्रकार झाला नाही. त्यांनी आत्महत्या वा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला नाही. कोणत्याही प्रकारची साधी जखमदेखील नसल्याचे सांगितले. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली, पण त्यांनीही याबाबत माहिती देण्याची जबाबदारी कनिष्ठ अधिकाऱयांवरच ढकलली.




























































