
सामना ऑनलाईन, पुणे
महाप्रलयंकारी पुरात अडकलेल्या सांगली-कोल्हापुरातील जनतेच्या दुःखाला आता पारावार राहिला नाही. नजर जाईल तिथंपर्यंत फक्त पाणीच पाणी. घरंदारं पाण्यात, पैपै जमवून उभारलेला संसार वाहून गेला. शेती बुडाली, शेकडो गुराढोरांचा मृत्यू झाला. या महाभयंकर आस्मानी संकटामुळे सर्वत्र आक्रोश सुरू आहे. त्यातच पलूस तालुक्यात ब्रम्हनाळ येथे मदत बोट उलटून 9 जणांचा बुडून मृत्यू झाला. दोन जण बेपत्ता आहेत. दरम्यान, एनडीआरएफ, नौदल, लष्कराच्या पथकांकडून बचाव कार्य वेगात सुरू आहे. आतापर्यंत 2 लाखांवर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
Photo- सांगली,कोल्हापुरातील पूरपरिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेला पाऊस पूर्णपणे थांबलेला नाही. कोयना, राधानगरीसह अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून विसर्ग सुरू झाला. पाऊस आणि धरणाचे पाणी सांगली, कोल्हापूर, कराडसह शेकडो गावांमध्ये घुसले आणि हाहाकार उडाला. गेले चार दिवस या दोन जिल्हय़ांमध्ये महापुराचा विळखा कायम आहे. गुरुवारी पावसाचा जोर मंदावला तरी हा विळखा कमी झालेला नाही.
सांगलीत तिसऱया मजल्यापर्यंत पाणी
सांगली शहर आणि जिल्हय़ाच्या पूर्व भागात तिसऱया मजल्यापर्यंत पाणी पोहचल असून, यावरून महापुराची भिषणता लक्षात येते. आर्यविन पुलाच्या 55.3 फुटांपर्यंत पाणीपातळी गेली आहे. कोयनेचा विसर्ग काही प्रमाणात कमी केला असला तरी चांदोली आणि इतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.
सांगली शहर आणि ग्रामीण भागात 30 हजारावर लोक पुरात अडकले आहेत.‘आम्हाला वाचवा’ असा आक्रोश शेकडो लोक करताना दिसत आहेत. ‘एनडीआरएफ’ लष्कराचे पथके, महापालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर जनतेला सुरक्षितस्थळी नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण बोटींची संख्या अपुरी आहे.
टोमॅटो 150 रूपये किलो, मेथी जुडी 50 रूपयांना
शेती बुडाल्यामुळे भाजीपाल्याची आवक थंडावली. सांगली-कोल्हापुरात भाज्यांचे दर कडाडले. टोमॅटो 120 ते 150 रुपये किलो, कांदा 60 रुपये, मेथी जुडी 40 ते 50 रुपये, कोथिंबीर 50 रुपये असे दर होते.
वीज, फोन बंद; पेट्रोल पंपही पाण्यात
महापुराचा फटका ग्रामीण जनतेला मोठय़ा प्रमाणावर बसला. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी वीज पुरवठा बंद केला आहे. दूरध्वनी यंत्रणा ठप्प आहे. पेट्रोल पंपही पाण्यात आहेत.
शेती बुडाली, पशुधनाचे प्रचंड नुकसान
कोल्हापूर-सांगली जिल्हे हे दुधाचे आगार म्हणून ओळखले जातात. गोकुळ, कृष्णा, वारणा, चितळेसह अनेक डेअरींकडून लाखो लिटर दुधाचे संकलन दररोज होते. हे दूध पुणे, मुंबई, ठाणे येथे पाठविण्यात येते. हजारो शेतकऱयांची उपजिविका दूध उत्पादनावर आहे. मात्र, महापुरात या दोन जिल्हय़ातील पशुधनाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. हजारो गाई-म्हशींचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. शेती पाण्यात बुडाली आणि पशुधनही गेले अशा संकटात येथील शेतकरी सापडला आहे. कुक्कुटपालनाचाही व्यवसाय या परिसरात मोठा आहे. त्याचेही प्रचंड नुकसान झाले आहे.
कोल्हापुरात सर्वत्र ‘बंद’, जनता हवालदिल
- कोल्हापूर शहर आणि परिसरातील परिस्थिती जैसे-थे आहे. गुरूवारी पंचगंगेची पाणी पातळीवर 53.8 फूटांवर आली होती. पण, महापुराची तीव्रता पूर्णपणे कमी झालेली नाही.
- कोल्हापूर शहरात 5 ते 8 फूट पाणी आहे. ऐतिहासिक दसरा चौकात पुराचे पाणी पहिल्यांदा आले.
- जिल्हय़ातील 223 गावांना महापुराचा फटका बसला. हजारो लोक अद्याप महापुरात अडकले आहेत.
- कोल्हापूर शहर आणि परिसरातील सर्व राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग बंदच आहेत. तीन दिवसांपासून कोल्हापूर जिल्हय़ाचा रस्ते मार्गाने संपर्क तुटलेला आहे.
- एनडीआरएफ आणि लष्कराची पथके युद्धपातळीवर बचावकार्य करीत आहेत. महापालिका आणि प्रशासकीय यंत्रणा, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मदतकार्य करीत आहेत.


























































