कोल्हापूर – जुना राजवाड्यात पारंपरिक पध्दतीने शाही परिवारांच्या उपस्थितीत दसरा सोहळा उत्साहात संपन्न

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा नवरात्रोत्सवातील शेकडो वर्षांच्या विजयादशमीतील सार्वजनिक सोहळा असलेल्या शाही दसरा परंपरेत खंड पडला असला तरी रितीरिवाजानुसार जुना राजवाड्यात पारंपरिक पध्दतीने, शाही परिवारांच्या उपस्थितीत दसऱ्याचा सोहळा उत्साहात संपन्न झाला. तर परंपरेनुसार लवाजम्यासह निघणा-या श्रीअंबाबाई, श्रीतुळजाभवानी तसेच गुरुमहाराजांच्या पालखी यंदा वाहनातुन निघाल्या.

img-20201025-wa0023

संपुर्ण देशात म्हैसूर पाठोपाठ करवीरनगरीचा शाही दसरा सोहळा प्रसिध्द आहे. ऐतिहासिक दसरा चौकात सुर्यास्तावेळी शाही परिवारांच्या उपस्थितीत पारंपरिक रिवाजात होणारा सीमोल्लंघनाचा सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडतो. या सोहळ्याला  लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवातील श्रीअंबाबाई मंदिरांसह सर्व मंदिरातील सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तर मानक-यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम पार पडले. यातीलच ऐतिहासिक दसरा चौक येथे होणारा शाही दसरा सोहळा यंदा रद्द करण्याचा निर्णय छत्रपती घराण्याकडुन घेण्यात आला होता. त्यामुळे यंदा हा दसरा चौक यंदा सीमोल्लंघनाविना सुनासुना राहिला.

दरम्यान, छत्रपती घराण्यानेही यंदा ऐतिहासिक दसरा चौक ऐवजी जुना राजवाडा येथील श्रीतुळजाभवानी मंदिरात अत्यंत साधेपणाने रितीरिवाजानुसार, सीमोल्लंघन सोहळा साजरा केला. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, महाराज कुमार मालोजीराजे छत्रपती, युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती यांच्या हस्ते शमीपूजन व आरती करण्यात आली. यानंतर सोने लुटण्याचा व पारंपरिक पालखी सोहळा प्रतिकात्मक पद्धतीने पार पडला. सोशल   डिस्टन्सिंगच्या नियमात व निवडक मानक-यांच्या उपस्थितीत हा शाही दसरा सोहळा पार पडला.

img-20201025-wa0021

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा रणरागिणी छत्रपती ताराराणी यांच्या करवीर संस्थानच्या गादीला मोठा मान आहे. नवरात्र आणि दसरा हा छत्रपती राजघराण्याचा कुळाचार आहे. वर्षातील नऊ दिवस या घराण्यातील व्यक्ती करवीर नगरीच्या बाहेर जात नाहीत.

मात्र यंदा पहिल्यांदाच युवराज छत्रपती संभाजीराजेंनी हा शिरस्ता मोडला. नवरात्रोत्सवाच्या सुरवातीपासूनच मराठवाड्यात दौरे काढून अतिवृष्टीने  संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर व्यक्त करुन मदतीची विनंती केली होती.

यंदा बाजारात उलाढाल ठप्प

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन, बेरोजगारी तसेच अनेकांच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने त्याचाही परिणाम यंदाच्या दसरा सणात दिसून आला. यात्रा, उत्सव सार्वजनिकरित्या बंद असल्याने छोट्या व्यावसायिकांवर त्याचा मोठा परिणाम झाला.

दरवर्षी दसरा सणाला सोने-चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी होणारी गर्दी यंदा तुरळक दिसुन आल्याने, सराफ व्यवसायिकांची कोट्यवधींची उलाढाल कमी झाली. फायनान्स योजनेमुळे इलेक्ट्रॉनिक दुकानांत टिव्ही, मोबाईल, फ्रिज आदी वस्तुंची खरेदी मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले. ऑनलाईन खरेदीमुळे अनेक दुकानातील उत्पन्नावरही मोठा परिणाम दिसून आला.

आपली प्रतिक्रिया द्या