
पन्हाळेकाजी लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढला आहे. मात्र लेणी परिसरात कोणत्याच प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने येथे आलेल्या पर्यटक, ईतिहासप्रेमी, अभ्यासकांची चांगलीच गैरसोय होत आहे.
दापोली तालूक्यातील कोटजाई नदीच्या काठावर असलेल्या डोंगरामध्ये एकूण 29 गुहा खोदलेल्या आढळतात. या गुहांमध्ये हीनयान बौद्ध पंथ, तांत्रिक वज्रयान पंथ आणि नाथ पंथातील प्रतिमांबरोबरच गणपती, लक्ष्मी, सरस्वती शिवलिंग इत्यादी देवतांच्या मूर्तीही आढळतात. हा लेणीसमूह खोदण्याची सुरुवात दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकापासून झाली. त्यावेळी हीनयान बौद्ध पंथ अस्तित्वात होता. त्यापुढील काळात म्हणजे सुमारे 8व्या ते 11व्या शतकापर्यंत खोदल्या गेलेल्या लेण्यात तांत्रिक वज्रयान पंथीयांचे वर्चस्व होते याचा पुरावा सापडतो. याच काळात काही मूळच्या हीनयान लेण्यांत गुप्त तांत्रिक पूजाविधीसाठी उपयुक्त असे फेरफार केले गेले असल्याचे लेण्यांमध्ये आढळून येते.
अशी ही प्राचीन लेणी केंद्र शासनाच्या अखत्यारितीतील हिंदुस्थानी पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली आहेत. या लेण्यांचा इतिहास, माहिती सांगणारे येथे कोणतेही साधन नाही. या लेणी समूहातील 4,5,6,7,8,9 क्रमांकाच्या गुहा मिळून जो गट तयार होतो तो सर्वात जुना म्हणजे हीनयान बौद्ध पंथीय लेणीसमूह आहे. त्याच्या पूर्वेस 1,2,3 व पश्चिमेस 10,11,12,13 हे वज्रयान पंथीय तर 14 व्या लेण्यात नाथपंथीय शिल्प भिंतीवर नाथसिद्धांची शिल्पे कोरलेली आहेत. 15 क्रमांकाचे लेणे मूळ वज्रयान व नंतर गाणपत्यपूजन यासाठी वापरले असावे असे वाटते. येथे सुमारे 5फूट उंचीचे गणपतीचे शिल्प दगडात कोरलेले आहे. अक्षोभ्याची, ध्यानस्थ बुद्ध अशा प्रतिमा अनेक लेण्यांमध्ये आहेत. पुढे शिलाहार काळात 19,20,21,22,23 ही लेणी निर्माण झाली. यामध्ये शिवलिंग, छतावर कमळाचे अलंकरण, बाजूच्या भिंतीवर रामायण, महाभारत, कृश्णलीला इत्यादी प्रसंगांची शिल्पे कोरलेली आहेत. 29 व्या लेण्यात शिवलिंग, गणपती, लक्ष्मी, सरस्वती, गंगा यमुना यांची शिल्पे आहेत. अशा या ठिकाणी पर्यटकांचा ईतिहासकांचा आणि अभ्यासकांचा येण्याचा सतत ओघ वाढत असला तरी रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. प्रत्येक लेण्यांच्या ठिकाणी माहीती दर्शविणारे माहीतीपटाचे फलकही उभारण्यात आलेले नाहीत. एखादयाला लघुशंका करावयाची झाल्यास येथे स्वच्छतागृहाची सोय नाही. खानपानाची सुविधा देणारे एखादे उपहारगृह नाही. गुगलवर माहीतीसाठी सर्च मारायचे झाल्यास नेट कनेक्टीव्हीटी मिळत नाही.
पन्हाळेकाजी ग्राम पंचायतीच्या हद्दीत सुप्रसिध्द लेणी असली तरी हा लेण्यांचा परिसर केंद्र शासनाच्या पुरात्व विभागाच्या ताब्यात आहे. येथे ग्राम पंचायतीला काही सोयी सुविधा करावयाच्या म्हटल्या तरी येथे निधी खर्च करता येत नाही. अनेकदा मागणी करून सुध्दा पुरात्व विभाग लक्ष देत नसल्याचे ता. दापोलीच्या ग्रुपग्राम पंचायत पन्हाळेकाजीचे सरपंच दिनेश जावळे यांनी सांगितले.






























































