गूढरम्य कोकण…

455

>> शशिकांत तिरोडकर

निसर्गाचे दैवी वरदान लाभलेले आणि उत्तम खाद्यसंस्कृतीची रेलचेल असलेले कोकण. कोकणातल्या रूढी-परंपरांना धार्मिक, सामाजिक संकेतांना गूढतेची सूक्ष्म किनार आहे. ‘देवाक काळजी’ अशा दोन शब्दांत आपल्या जगण्याचा सारा भार देवावर टाकणारा इथला माणूस . सगळय़ा सुखदुःखाच्या लढाया चिवटपणाने लढतो. गावातल्या रामेश्वराच्या, पावणादेवीच्या किंवा एखाद्या रवळनाथाच्या मंदिरात आपले गाऱ्हाणे घेऊन येतो. मंदिराच्या एखाद्या खांबाला टेकून, निवांतपणे, देवाच्या भरोशावर आश्वस्त होतो. सगळय़ा चिंता, अडचणी देवाच्या पायाशी ठेवून देतो. अशा श्रद्धेपोटीच अनेक रूढी-परंपरा, चमत्कारिक क्रतवैकल्ये इथल्या समाजात रूढ झालेली दिसतात.

मालवण तालुक्यातील आचरे गावची ‘गावपळण’ हीसुद्धा अशा बळकट श्रद्धेची एक वैशिष्टय़पूर्ण व महत्त्वाची परंपरा आहे. गावपळण म्हणजे सगळा गाव पळून जाणे होय. गाव सोडून कधी निघून जायचे हे ग्रामस्थ ठरवीत नाहीत तर त्यासाठी श्री देव रामेश्वराचा कौल घेतला जातो. मंदिरातले बारापाचाचे मानकरी श्री देव रामेश्वराचा आदेश घेऊन तारखा जाहीर करतात. ढोल-नगारे वाजवून सगळय़ा गावाला ही खबर दिली जाते. त्या दिवसापासून सगळय़ा गावाची एकच धावपळ सुरू होते. प्रत्यक्ष गाव सोडून जाण्याच्या दिवसाअगोदर सगळे गावकरी गावचा अधिपती देव रामेश्वराला गाऱहाणे घालतात. ‘‘बा देवा! श्री देव रामेश्वर महाराजा, तुझ्या हुकुमाप्रमाणे आज आम्ही गाव सोडीत आहोत. सगळय़ांची रखवाली कर. सांभाळून घे आणि तुझी प्रथा खरी करून घे!’’ यानंतर सात-आठ हजार लोकवस्ती असलेला हा अख्खा गाव चालू लागतो. आपापली घरेदारे शेतीवाडी तिथेच सोडून निःशंक मनाने गावची सीमा ओलांडून निघून जातो. तीन दिवस तीन रात्री राहुटय़ा उभारून उघडय़ावर मोकळय़ा आकाशाखाली आपापले संसार थाटतात. या महामेळाव्यात उत्साह ओसंडून वाहत असतो. भजन, कीर्तन, गाणी, नृत्य, फुगडय़ा असे अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम मोठय़ा हौसेने केले जातात.

या दिवसांत शाकाहारी जेवणासोबतच सामिष जेवणासाठी गावातून येताना सोबत आणलेली कोंबडी, बकरे तसेच लगतच्या नदीतून आणलेल्या माशांवर यथेच्छ ताव मारला जातो. गावातून निघून आल्याचे दुःख आनंदाने साजरे करणारा हा गाव देवावरील श्रद्धेने अधिक जवळ येतो. मोकळा होतो. रोजच्या ताणतणावातून मुक्त होतो.

असे म्हणतात, पूर्वी हा गाव सुखाने नांदत नव्हता. तो नांदावा म्हणून रामेश्वराला गावाने साकडे घातले. अडचण ही होती की, रामेश्वराला म्हणजे शंकराला त्याच्या भोवती वावरणाऱया पिशाच योनीतील भक्तगणांना एकांतात भेटता येत नव्हते. म्हणून मग तीन-चार वर्षांतून चार दिवस सगळा गाव रिकामा केला जातो आणि शंकराच्या अदृश्य पिशाच्चगणांना मुक्तपणे वावर करण्याची मुभा दिली जाते. या गावाची सगळी जमीनच रामेश्वर संस्थानच्या मालकीची आहे. गावातून निघून गेल्यानंतर गावात परत कधी यायचे यासाठीसुद्धा रामेश्वराचा कौल घेतला जातो.

कोकणातील अशा इतरही काही अद्भुत, चमत्कारिक गोष्टींचा उल्लेख करावासा वाटतो. मालवण-कुडाळ रस्त्याला चौक्याच्या पुढे, सुनीता देशपांडेंचे आजोळ असलेल्या धामापूर गावाजवळ ‘कासार टाका’ नावाचे एक विलक्षण ठिकाण आहे. अगदी रस्त्यालगत, निर्मनुष्य जागेत असलेल्या कासार टाक्याला माणसे वेगवेगळे नवस बोलतात. त्यामुळे भक्ताची कसलीही अडचण दूर होते. अडलेली कामे होतात, अशी अनेकांची श्रद्धा आहे. नवस फेडायचा असेल तर कोंबडा, दारू आणि सिगारेट यांचा नैवेद्य इथल्या ‘‘ठिकाणा’’ला देण्याची प्रथा आहे. पूर्वीच्या काळी गावोगाव फिरून बांगडय़ा विकणाऱया कासाराला या आडवाटेवर गाठून वाटमारी करणाऱयांनी क्रूरपणे मारले. तेव्हापासून तो कासार इथे येणाऱया प्रत्येकाच्या मदतीला धावून येतो असा समज आहे.

सावंतवाडी तालुक्यातील दाभील नावाचे एक गाव आहे. या गावात एकही विहीर नाही. किंबहुना विहीर मारली तर पाणीच लागत नाही; परंतु वरच्या भागात गुळगुळीत काळय़ाशार दगडात सात (बावी) विहिरी आहेत. या निसर्गनिर्मित विहिरींचे पाणी साऱया गावाची तहान भागवते. कोकणात नैसर्गिक चमत्कारांची अशी उदाहरणे आहेत तशीच चमत्कारिक रीती-रिवाजांचीसुद्धा कितीतरी ठिकाणे आहेत.

मातोंड हे चहाचे एकही दुकान नसलेले गाव. जत्रेतसुद्धा चहाचे हॉटेल लावत नाहीत. गावात दारू प्यायला बंदी, पण डोंगरात भरणारी घोडेमुखची जत्रा हा देव ब्राह्मण असून त्याला शुद्ध शाकाहारी नैवेद्य दिला जातो आणि त्याच्या गणांना मात्र कोंबडय़ाचा नैवेद्य द्यावा लागतो. म्हणून या जत्रेला ‘‘कोंब्याची जत्रा’’ म्हणतात.

देवगड तालुक्यातील नारिंग्रे गावात कोणीही कोंबडी पाळीत नाहीत. अगर बाहेरून आणून खाऊ शकत नाही. गावाचे तसे कडक नियम आहेत. तर म्हापण गावात येसू आकाच्या देवळात नवस फेडायचा असेल तर सुक्या बांगडय़ाची चटणी आणि नाचण्याची भाकरी असा अस्सल मालवणी बेत करावा लागतो.

उभादांडा येथील ‘मानसीचा चाळा’ नावाचे एक जागृत स्थळ आहे. तिथे नवस फेडायचा असेल तर खेकडय़ांची माळ आणि गॅसची बत्ती देतात. या चाळय़ाच्या जत्रेला ‘बत्तेची जत्रा’ म्हणतात.

परुळे गावच्या येतोबाच्या देवळात म्हणे, भिंतीला लोखंडी खंजीर चिकटतो. या उत्सवाला बाक उत्सव म्हणतात तर आरवली गावात वेतोबाचे सुप्रसिद्ध देऊळ आहे. त्याचा नवस फेडण्यासाठी सोनकेळीचा घड आणि चामडय़ाची चपले भेट म्हणून देतात. वेताळाला दिलेली चपले ठेवल्या जागेवर आपोआप झिजतात. अशी झिजलेली चपले आजही पाहायला मिळतात.

मालवण तालुक्यातील पेंडुर गावचे मसणे परब लग्न लावण्याआधी देवळाच्या आवारात स्मशानातले सगळी विधी करून मग लग्नाच्या बोहल्यावर उभे राहतात. याच तालुक्यातील कोईल गावातील रहिवासी हे लग्नपत्रिकेत गणपतीची प्रतिमा छापत नाहीत. कोणाच्याच घरी गणपती पूजन करीत नाहीत. भिंतीवर गणपतीचे कॅलेंडरसुद्धा लावीत नाहीत. कणकवली तालुक्यातील कुर्ली गावचे पाटील घराण्यातले लोक तुळशीच्या लग्नादिवशीच म्हाळ घालतात. वालावल गावातला एकही माणूस म्हणे पंढरपूरला जात नाही.

फोंडाघाट येथील वाघोबाचे मंदिर हे समस्त अनिष्ट शक्तींना रोखून धरणारे शक्तिस्थळ आहे असे मानतात. इथले मंदिर फक्त एका रात्रीत बांधायचे अशी विचित्र अट होती. शेवटी गावकऱ्यांनी धाडस करून अतिशय नियोजनपूर्वक सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतच्या वेळेत मंदिराचे बांधकाम पूर्ण केले.

पुराणात ज्याचा ‘एकचक्रानगरी’ म्हणून उल्लेख आहे ते गाव वैभववाडी तालुक्यात सह्याद्रीच्या निबीड अरण्यात आले. इथे मोठमोठय़ा गुहा असून गाडाभर अन्न खाणाऱ्या बकासुराचे वास्तव्य तिथे होते असे सांगितले जाते. दगडात कोरलेला महाल आणि काळय़ा दगडाचा प्रशस्त पलंग आजही तेथे आहे. पांडवांना अन्न पुरवणाऱ्या ब्राह्मणाचा वाडाही जवळ आढळतो. या दुर्गम भागात प्रशस्त गुहा आहेत, पांडवांची लेणी आहेत आणि भरपूर पाण्याचे साठेही आहेत. अंगी खूप धाडस आणि चिकाटी असल्याशिवाय इथे पोहोचणे खूप अवघड आहे. अरण्यातील या विशिष्ट जागेला राकसमाळ असेही म्हणतात. कोकणातील अशा असंख्य अद्भुत ठिकाणांना पर्यटनाच्या नकाशावर आणायला हवे. कोकणातील गूढता समजून घ्यायला हवी.

आपली प्रतिक्रिया द्या