
स्टेट बँकेच्या कोरेगाव शाखेतील कॅश डिपॉझिट मशीनमध्ये दोन हजार रुपयांच्या 19 बनावट नोटांचा भरणा केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी सागर शिर्के (रा. बोबडेवाडी, ता. कोरेगाव) या युवकास अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, नोटा बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
बँकेच्या तपासणीमध्ये या नोटा बनावट असल्याचे निदर्शनास आले. बँकेच्या शाखाधिकाऱ्यांनी ज्या खात्यामध्ये या नोटांचा भरणा झाला, त्याची माहिती देत फिर्याद दिली होती. गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील व उपअधीक्षक गणेश किंद्रे यांनी तपासाविषयी पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांना सूचना दिल्या होत्या.
प्रभाकर मोरे यांनी विनाविलंब उपनिरीक्षक विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार केले. त्यांनी बोबडेवाडी येथे जाऊन राहत्या घरातून सागर शिर्के याला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिल्यानंतर शिर्के याला घेऊन पोलीस पथकाने थेट मुंबईतील वरळीकडे धाव घेतली. शिर्के हा तेथे राहत असल्याने त्या घरातून संगणक, प्रिंटर, कागद जप्त करण्यात आले. पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे व पोलीस नाईक अमोल सपकाळ तपास करीत आहेत.



























































