कोरठण खंडोबा २१ ते २३ जानेवारी वार्षिक यात्रा महोत्सव

125

सामना प्रतिनिधी । नगर

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या, नगर जिल्हयातील पारनेर तालुक्यातील, पिंपळगांवरोठा येथील स्वयंभू श्री क्षेत्र कोरठण खंडोबाचा वार्षिक यात्रा महोत्सव २१ ते २३ जानेवारी २०१९ दरम्यान होणार आहे. 3 दिवसांच्या या यात्रेला अंदाडे 6 लाखांवर यात्रेकरु उपस्थित राहतील असा अंदाज आहे. भक्तगण आपले कुलदैवत खंडोबाच्या कोरठण गडावर येऊन देवदर्शन व तळीभंडार करून खोबरे उधळतील आणि ‘सदा आनंदाचा येळकोट’, ‘‘येळकोट येळकोट जय मल्हार’’या जयघोषाने, कोरठण गड दुमदुमणार आहे.

२०१९ या नववर्षातील जिल्ह्यातील ही पहिली मोठी यात्रा असून, धार्मिक व सामाजिक संस्कृती जोपसणारी लाखो भाविकांच्या, भक्तीमय मांदीयाळीचे दर्शन घडविणारी यात्रा म्हणून या यात्रेचे महत्व आहे. पौष पौर्णिमेला श्री खंडोबाचे म्हाळसादेवी बरोबर लग्न झाले म्हणून दरवर्षी पौष पौर्णिमेला 3 दिवस मोठा यात्रोत्सव येथे भरतो. पौष षष्टीला शेकडो महिला देवाला हळद लावतात व यात्रेला सुरुवात होते. यात्रा पूर्व नियोजनासाठी तहसीलदार गणेश मरकड यांनी सर्व विभागाला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ट्रस्ट व प्रशासन तयारी करत आहे

सोमवार, दि २१ जानेवारी पौष पौर्णिमेला पहाटे ४ वा श्री. खंडोबा देवाला मंगलस्नान पुजा, चांदीच्या सिंहासनाचे व चांदीच्या उत्सव मूर्तीचे अनावरण होईल.त्यानंतर सकाळी ६ वा अभिषेक, महापूजा, महाआरती होऊन भाविकांना यात्रेतील दर्शनासाठी मंदिरे खुले होईल. दिवसभर तळीभंडार व देवदर्शन चालू राहील. सायंकाळी 4 वा. श्री कोरठण खंडोबा पालखी पिंपळगांवरोठा गावात मुक्कामी जाईल. रात्री गांवात पालखी छबीना मिरवणूक होईल.

मंगळवार दि २२ जानेवारी रोजी स. 6 वा. पासून देवदर्शन सुरु होईल. नंतर श्री खंडोबा पालखीचे स 9 वा. पिंपळगांवरोठा गांवातून प्रस्थान होऊन श्री खंडोबा मंदिराकडे पालखी सोहळा दु.12 वा. रवाना होईल. दिवसभर भाविकांचे तळीभंडार व देवदर्शन चालू राहील. सायं.4 वा. सावरगांव घुले ता.संगमनेर येथून आलेल्या श्री खंडोबाच्या मानाच्या पालखीची मिरवणूक व देवदर्शन कार्यक्रम मंदिराजवळ होईल. रात्रौ 10 वा.पर्यंत मंदिराजवळ श्री कोरठण खंडोबा देवाचा पालखी छबीना मिरवणूक होईल.

बुधवार दि २३ जानेवारी हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. सकाळी ८ वा. श्री खंडोबा चांदीची पालखी आणि अळकुटी, बेल्हे, कांदळी वडगांव, माळवाडी (ता. जुन्नर) सावरगांव घुले (ता. संगमनेर),येथून आलेल्या पालख्यांची भव्य शोभा मिरवणूक (छबीना) निघेल. दु 12 वा. छबीना मंदिरा पायर्‍यांवर येऊन पालख्यांच्या मिरवणुकीची सांगता होईल. हा मिरवणूक सोहळा भाविकांच्या डोळ्याची पारणे फेडणारा असतो. दुपारी १ वा. बेल्हा व ब्राह्मणवाडा येथून आलेल्या मानाच्या काठ्यांची मिरवणूक सुरु होईल. या दोन्ही काठ्या पालखी मार्गावरुन मंदिराचे समोर पायर्‍यांवर आल्यानंतर तहसिलदार गणेश मरकड आणि पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांचे हस्ते दोन्ही काठ्यांची शासकिय महापुजा होईल. महाआरती होऊन काठ्यांचे देवदर्शन होईल. त्यानंतर वाफारेवाडी, साकोरी, गारखिंडी, कळस येथून आलेल्या मानाच्या काठ्यांची मिरवणूक होईल. नंतर बुगेवाडी, नारायणगाव सर्व काठ्यांचे देवदर्शन होऊन यात्रेची सांगता होईल. देवस्थानाचा सभामंडप पहिला मजला हॉल बांधकाम छताचे कामासाठी दहा लाखाचा निधीची आवश्यकता असून भाविकभक्त, यात्रेकरूंची त्यासाठी देणगी देऊन देवस्थानाला सहकार्य करावे, असे आवाहन ट्रस्टने केले आहे. यात्रेत प्लस्टिक बंदी करण्यात आली आहे

यात्रा काळात श्री खंडोबा मंदिर ते खंडोबा फाटा हा 1 कि.मी. रस्ता तीन दिवस दोन्ही बाजूंनी सर्व वाहनांसाठी बंद राहील. खंडोबा फाटा व भंडारा टेकडी येथे वाहने पार्कीग व्यवस्था आहे. आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अखण्ड विजपुरवठा, मोठा पोलीस बंदोबस्त, वायरलेस, वॉकी टॉकी, वाहतूक नियंत्रण, दंगल नियंत्रक पथक, दर्शनबारी व्यवस्था, दारुबंदी पथक, होमगार्डस, पोलीस मित्र पथक, अळकटी कॉलेज स्वयंसेवक, क्रांती शुगर कारखाना सुरक्षा पथक, ग्रामस्थ स्वयंसेवक इ.चे चोख नियोजन व बंदोबस्त देण्यात आला आहे. एसटी तर्फे ५० जादा यात्रा स्पेशल गाड्या सोडण्यात याव्यात, अशी मागणी केलेली आहे. यात्रेकरुंनी यात्रेत अफवा पसरवू नयेत. तसेच लहान मुले महिला यांना गर्दीत त्रास होऊ नये म्हणून पोलिसांचे विशेष पथक यात्रेत राहणार आहे. यात्रेत बकरे बळी, गुटखा, मावा, दारु विक्री इत्यादीवर सक्त बंदी आहे. यात्रेत संवेदनशील व गर्दीच्या जागेत जादा सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावून नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. यात्रेतील मिठाई, हॉटेल, दुकानदार व इतर विक्रेत्यांना देवस्थानतर्फे जागा निश्‍चीत करुन देण्यात येणार आहेत. तसेच देवस्थानतर्फे दुकानदारांना पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

यात्रेच्या काळात मंदिरात तळी भरणे, नारळ फोडणे, तेल वाहण्यास बंदी आहे. यात्रेत दुकानदारांनी गॅस सिलेंडर वापरण्यास मनाई आहे. यात्रा उत्सव शांततेत संपन्न होण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा, अधिकारी, पोलीस व देवस्थानाला सहकार्य करावे, असे निवेदन प्रांताधिकारी गोविंद दाणेज, तहसीलदार गणेश मरकड, पोलीस निरीक्षक बाजीराव पवार, देवस्थानचे अध्यक्ष अॅड.पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, सरचिटणीस महेन्द्र नरड, चिटणीस मनिषा जगदाळे, खजिनदार हनुमंत सुपेकर, यात्रासमिती अश्विनी थोरात, उत्सव समिती- साहेबराव गुंजाळ, अन्नछत्र समिती- चंद्रभान ठुबे, विश्‍वस्त अमर गुंजाळ, किसन मुंढे, बन्सी ढोमे, मोहन घनदाट, दिलीप घोडके, देविदास क्षीरसागर, सर्व माजी विश्वस्त तसेच कोरठण पंचक्रोशी ग्रामस्थ, ग्रामपंचायत व मुंबईकर मंडळी यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या