कुडाळच्या नगराध्यक्षपदी ओंकार तेली तर उपनगराध्यक्षपदी सायली मांजरेकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ  

कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी सोमवारी निवडणुक कार्यक्रम नगरपंचायत येथे पार पडला. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून देवानंद (सचिन) काळप तर काँग्रेसकडून गटनेते ओंकार तेली यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. तर उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून गटनेते  महेंद्र (बाळा) वेंगुर्लेकर तर काँग्रेसकडून सायली कुंभार-मांजरेकर यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. प्रथमतः नगराध्यक्ष पदासाठी हात उंचावून मतदान झाले. त्यानंतर उपनगराध्यक्ष पदासाठी हात उंचावून मतदान झाले. दोन्ही पदाच्या निवडीत सत्ताधारी बहुमताच्या जोरावर विजयी झाले.

नगराध्यक्ष पदासाठी  तेली यांना नऊ तर  काळप यांना सात मते पडली. उपनगराध्यक्ष पदासाठी  मांजरेकर यांना नऊ तर  वेंगुर्लेकर यांना सात मते पडली. दोन्ही पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या नगरसेविका उषा आठल्ये यांनी शिवसेनेला मतदान केले तर अपक्ष नगरसेवक एजाज नाईक दोन्ही निवडीत तटस्थ राहीले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.विकास सुर्यवंशी यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री.तेली तर उपनगराध्यक्ष सौ.मांजरेकर यांची निवड जाहीर केली. न.पं.चे मुख्याधिकारी देवानंद ढेकळे, शिवसेना गटनेते महेंद्र वेंगुर्लेकर, नगरसेवक सचिन काळप, गणेश भोगटे आदी उपस्थित होते.

बांधकाम कोणाला मिळणार?
गटनेते ओंकार तेली यांची अलीकडेच नगरपंचायतीच्या वित्त व बांधकाम सभापती पदी निवड करण्यात आली होती. आता नगराध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या निवडीनंतर बांधकाम सभापती पद कोणाला मिळते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.