
श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रौत्सव 1 मार्चला महाशिवरात्रीनिमित्त होणार आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले असले तरी कोरोना निर्बंधांचे पालन करून यात्रौत्सव साजरा करण्यात येणार आहे. कुणकेश्वर परिसरातील विकास कामांची पूर्तता, तसेच विविध सोयी सुविधा या यात्रौत्सवापूर्वी पूर्ण करण्याकरिता सूचना देण्यात आल्या आहेत. अपुरी विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी कुणकेश्वर यात्रा नियोजन पूर्व बैठकीत संबंधित विभागांच्या आढावा बैठकीत दिली.
दक्षिण कोकणची काशी समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रा 1 व 2 मार्च रोजी होणार आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले असल्याने या वर्षी कोरोनाचे प्रतिबंधात्मक उपाययोजना करून यात्रा होणार आहे. त्यासाठी विविध खात्यांची आढावा बैठक श्री क्षेत्र कुणकेश्वर सभागृहात उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
यावेळी परिक्षाविधींन कालावधीतील उपजिल्हाधिकारी तथा गटविकास अधिकारी (आयएएस)संजीता महापात्र,तहसीलदार मारुती कांबळे,पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अधिकारी श्रीनिवास बासुतकर यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने मुख्यमंत्री ग्रामसडक रस्ता, व्हीआयपी मार्ग, रस्त्यातील वाढलेली झाडी, तसेच बीएसएनएल रेंज, भरारी पथक, आपत्ती व्यवस्थापन, दर्शन रांगा, पाणीपुरवठा, पोलीस बंदोबस्त, आरोग्य यंत्रणा, स्वछता ग्रामपंचायत नियोजन अन्य विविध खात्यांचा आढावा घेत अपूर्ण विकास कामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना उपविभागीय अधिकारी यांनी दिल्या.





























































