
कुर्ला स्थानकात हृदयविकाराचा झटका आलेल्या एका प्रवाशाला आरपीएफच्या जवानाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखत कार्डिओ पल्मनरी रेसिसटेशन (सीपीआर) दिल्याने त्याचा जीव वाचल्याचे समोर आले आहे. सदर जवान सीपीआर देत असल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून प्रवाशांकडून त्याचे कौतुक होत आहे.
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील फलाट क्रमांक 7-8 वर गुरुवारी सकाळी कामावर निघालेल्या एका प्रवाशाला अस्वस्थ वाटू लागल्याने तो फलाटावर बसला होता. त्यानंतर काही क्षणातच तो बेशुद्ध झाल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी डय़ुटीवर असलेल्या आरपीएफ जवान मुकेश यादव यांनी धाव घेत जवळ जाऊन पाहणी केली असता सदर व्यक्तीला हृदयविकाराचा झटका असल्याची लक्षणे त्यांना दिसली. त्यामुळे त्यांनी तत्काळ त्यांना फलाटावर झोपवत सीपीआर दिला. यावेळी अन्य प्रवाशांनीही त्यांना मदत केल्याने त्यांच्या अडखळणारा श्वास सुरू झाला. त्यानंतर संबंधित व्यक्तीला नजीकच्या भाभा रुग्णालयात दाखल केले असता त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगत वेळीच सीपीआर दिला नसता तर जिवावर बेतले असते असे सांगितले. दरम्यान, आरपीएफ जवानाच्या कामगिरीचे प्रवाशांकडून कौतुक केले जात आहे.






















































