
झी मराठीवरील ‘लागिरं झालं जी’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी बावकर आता वेगळ्या भूमिकेतून पुन्हा एकदा छोटय़ा पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनी मराठीवरील ‘कुसुम’ या मालिकेत शिवानी सासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱया पार पाडणाऱया कुसुमच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे.
त्यात दिसतेय की, लोकलमध्ये कुसुमची मैत्रीण तिला संध्याकाळी मिसळ पार्टी करण्याबद्दल विचारते, तेव्हा बाबांना दवाखान्यात घेऊन जायचं आहे, असं ती सांगते. त्यावर अजूनही तूच करतेस त्या घरचं? असं तिची मैत्रीण विचारते. त्यावर कुसुम तिला विचारते की, ‘सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची गरज आहे का?’ सर्वच मुलींच्या मनातला प्रश्न तिने यात बोलून दाखवला आहे आणि म्हणूनच कुसुम तुमच्या-आमच्यातली वाटते. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



























































