किलियन एम्बापे मेस्सी, रोनाल्डोलाही मागे टाकणार…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येत्या 20 डिसेंबरला फ्रान्सचा युवा फुटबॉलपटू किलियन एम्बापे 22 वर्षांचा होईल. यावेळी त्याचे वय सांगण्याचे कारण की, या फुटबॉलमधील सुपरस्टार खेळाडूने वयाच्या 22व्या वर्षी जे काम केले आहे, ते लियोनेल मेस्सीला 33 आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोला 35व्या वर्षापर्यंतही करता आलेले नाही. किलियन एम्बापे याने फ्रान्सला वर्ल्ड कप जिंकून दिलाय. मात्र क्लबसाठी मोलाची कामगिरी करणाऱया लियोनेल मेस्सीला अर्जेंटिनासाठी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोला पोर्तुगालसाठी अद्याप वर्ल्ड कप जिंकून देता आला नाही. रविवारी मध्यरात्री चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. यावेळी पॅरिस सेण्ट जर्मेन व बायर्न म्युनिच यांच्यामध्ये जेतेपदाची लढत होईल. किलीयन एम्बापेच्या पॅरिस सेण्ट जर्मेन संघाने फायनलसह ही स्पर्धा जिंकली तर लहान वयामध्ये फ्रान्सचा हा खेळाडू नक्कीच लियोनेल मेस्सी व ख्रिस्तियानो रोनाल्डो या दिग्गज फुटबॉलपटूंपेक्षा वरचढ असेल यात वाद नाही. कारण पॅरिस सेण्ट जर्मेन आणि किलियन एम्बापे या दोघांनाही अद्याप चॅम्पियन्स लीग जिंकता आलेली नाही.

पहिल्या जेतेपदाची आस

पॅरिस सेण्ट जर्मेन व किलियन एम्बापे या दोघांनाही पहिल्यावहिल्या चॅम्पियन लीग स्पर्धेच्या जेतेपदाची आस लागून राहिली आहे. किलियन एम्बापे याने आपल्या पाच वर्षांच्या कारकीर्दीत सहावेळा आपल्या संघासाठी स्थानिक स्पर्धा जिंकलीय. किलियन एम्बापे याने पॅरिस सेण्ट जर्मेनसाठी फ्रेंच कप व लीग कपदेखील जिंकून दिलाय. मात्र त्यांना अद्याप चॅम्पियन्स लीग स्पर्धा जिंकता आलेली नाही.

मेस्सीने 34, तर रोनाल्डोने 27 वेळा बाजी मारलीय

लियोनेल मेस्सी 2005 सालापासून बार्सिलोनासाठी खेळतोय. या कालावधीत बार्सिलोनाने दहावेळा ला लीगा, चारवेळा चॅम्पियन्स लीग जिंकण्याची करामत करून दाखवलीय. लियोनेल मेस्सी सदस्य असलेल्या संघाने एकूण 34 जेतेपदांवर मोहोर उमटवलीय. तसेच पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डो सदस्य असलेल्या संघाने 27 वेळा विविध स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम करून दाखवलाय. तो सदस्य असलेल्या रिअल माद्रिद संघाने चारवेळा, तर मँचेस्टर युनायटेडने एकवेळ चॅम्पियन्स लीग किताब जिंकलाय. तसेच त्याने मँचेस्टर युनायटेड, रिअल माद्रिद, युवेण्टस या संघांना स्थानिक स्पर्धाही जिंकून दिल्या आहेत.