चेटकीण असल्याच्या संशयाने महिलेला जाळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सामना ऑनलाईन । गुजरात

आजच्या काळातही लोक अंधश्रद्धेचा किती आहारी गेले आहे  याचा प्रत्यय आलाय गुजरातमधील अरवल्ली जिल्ह्यातील रामगढी गावात. गावातील एका महिलेला चेटकीण असल्याच्या संशयावरून जिवंत जाळले. शांता बेन असे या महिलेचे नाव आहे.

शांता बेन त्यांचे पती कुबेर भाई परमार यांच्या समवेत राहतात. २१ जून रोजी रात्रीच्यावेळी कुबेर भाई यांचा भाचे बाबू हिरा परमार, कोदर हीरा परमार व त्यांची पत्नी ज्योत्स्ना बेन परमार हे त्यांच्या घरी पोहचले. तु माझा मुलांवर काळी जादू केली आहेस, त्यामुळेच तो वेडा झालाय असा आरोप त्यांनी शांतावर लावला. तसेच तिला तू चेटकीण आहेस, असे म्हणून शिवीगाळ करून ते निघून गेले.

आपल्यावर असे आरोप लावण्याबद्दल जाब विचारण्यासाठी शांताबेन त्यांच्या मागे गेल्या. यामुळे वाद आणखीन वाढला. या वादातच बाबू, कोदर आणि ज्योत्स्ना यांनी शांताबेन यांच्यावर रॉकेल ओतून त्यांना जाळायचा प्रयत्न केला. आग लागल्यानंतर घाबरून शांताबेन घराच्या दिशेने पळत सुटल्या. शांता यांचा आवाज ऐकून शेजारचे लोक घराबाहेर आले व त्यांनी आग विझवली. जखमी झालेल्या शांताबेन यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत त्या ५० टक्के भाजल्या आहेत. या संदर्भात पोलीस चौकशी करत आहेत.