बदली हवी असेल तर बायकोला पाठव, धमकीमुळे लाईनमॅनने स्वतःला पेटवलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरी येथील वीज वितरण विभागात एक गंभीर प्रकरण घडल्याचं वृत्त आहे. येथील एका लाईनमॅनने वरिष्ठावर गंभीर आरोप करून स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली आहे.

या लाईनमॅनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्याने या व्हिडीओत त्याच्या वरिष्ठ असलेल्या कनिष्ठ अभियंत्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्याच्या आरोपानुसार, कनिष्ठ अभियंत्याने बदलीसाठी पत्नीची मागणी केली आहे.

मृत व्यक्तिचं नाव गोकुल प्रसाद असं आहे. तो कुकरा अलिगंज येथे लाईनमॅन पदावर तैनात होता. तो गेल्या 22 वर्षांपासून वीज वितरण विभागात कार्यरत होता. तो पलिया येथील हायडिल कॉलनीत राहतो.

शनिवारी त्याने त्याच्याच घराच्या परिसरात अंगावर डीझेल ओतून स्वतःला पेटवलं. कुटुंबाने आणि शेजाऱ्यांनी आग विझवली आणि त्याला खासगी रुग्णालयात दाखल केलं. तिथून त्याला जिल्हा रुग्णालयात आणि तिथून लखनौ येथील रुग्णालयात दाखल केलं. पण, तिथे उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मृत्यू होण्यापूर्वी त्याने एका व्हिडीओद्वारे कनिष्ठ अभियंत्यावर गंभीर आरोप केले आहेत. गोकुल याला बदली हवी होती. पण, कनिष्ठ अभियंत्याने त्याच्याकडे पैसे मागितले होते. तसंच त्याच्या पत्नीकडून शरीरसुखाची मागणीही त्याने गोकुलकडे केली होती. या प्रकरणी स्थानिकांच्या रोषानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कनिष्ठ अभियंत्याला निलंबित केलं आहे. तसंच, त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.