भेंडवाडीच्या पुनर्वसनासाठी सुचवलेल्या परिसरातील जमिनीला तडे

22

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

तिवरे धरणफुटीतील दुर्घटनाग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी निवडलेली जागाच संकंटात सापडली आहे. भेंडवाडीपासून काही अंतरावर असलेल्या या परिसरातील जमिनीला तडे गेले आहेत. त्यामुळे भूगर्भ वैज्ञानिकांचा अहवाल घेऊनच त्या जागेत पुनर्वसन करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

2 जुलैला रात्री तिवरे धरण फुटून 23 जण वाहून गेले. त्यापैकी 20 जणांचे मृतदेह सापडले असून उर्वरित 3 जणांचा शोध सुरु आहे. धरणफुटीनंतर भेंडवाडी उध्वस्त झाली असून भेंडवाडीच्या पुनर्वसनाच्या प्रश्न निर्माण झाला आहे. शासकीय स्तरावर भेंडवाडीपासून काही अंतरावर असलेल्या जागेवर पुनर्वसन करण्याचा विचार सुरु होता. या जागेवर पक्की घरे होईपर्यंत शेड उभारुन दुर्घटनाग्रस्तांच्या निवार्‍याची व्यवस्था करण्यात येणार होती. मात्र त्या परिसरातील जमिनीला मोठ्या प्रमाणात तडे गेलेले दिसून येत आहेत. प्रांताधिकारी कल्पना जगताप- भोसले आणि तहसीलदार जीवन देसाई यांनी आज त्या जागेची पाहणी केली. त्या जमिनीला तडे गेले होते. भूगर्भ वैज्ञानिकांकडून त्या जमिनीचा अहवाल घेऊनच पुनर्वसनाबाबतचा पुढील निर्णय होणार आहे.

चिपळूण तालुक्यातील मोरवणे धरणाला गळती असल्यामुळे तेथील रहिवाश्यांना स्थलांतराच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. तसेच कामथे हरेकरवाडीतील काही कुटूंबियांना स्थलांतराच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या