
महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटरस्त्यावर रस्तेकाम सुरू असलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर पुन्हा एकदा दरड कोसळल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.
महाबळेश्वर तालुक्यात जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे आंबेनळी घाटरस्त्याचे मोठे नुकसान झाले होते. महाबळेश्वरपासून आंबेनळी घाटरस्ता हा किल्ले प्रतापगड तसेच कोकणाला जोडणारा मुख्य घाटरस्ता आहे. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून रस्त्यावरील माती, मोठमोठे दगड हटविण्याचे काम सुरू आहे. एका ठिकाणी संपूर्ण रस्ताच खचला होता.
या खचलेल्या रस्त्यावर सध्या भराव टाकून जाळीचे बेड तयार करून त्या बेडमध्ये दगड भरण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. खचलेला रस्ता जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम सुरू असतानाच जवळच दरड कोसळल्याने मोठमोठे दगड, माती मुख्य रस्त्यावर आले. त्यामुळे रस्तेकामात अडथळा निर्माण झाला आहे. सुदैवाने यात जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कोसळलेल्या दरडी हटविण्याचे काम सुरू आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी गोपाळ लालबेग, ऍड. अरुण बावळेकर उपस्थित होते.






























































