
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
चिपळूण शहरात वशिष्टी नदीच्या पुराचे पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. कालुस्ते येथे घरांवर दरड कोसळून पाच घरांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत एक महिला जखमी झाली आहे. चिपळूण तालुक्यातील कालुस्ते खुर्द करंजीकर मोहल्ला येथे दरड कोसळून मंजूर परकार, अली परकार ,सुलतान परकार ,हलीमा अब्दुल कादिर परकार, सल्लादिन परकार ,नजीर परकार,फईन परकार यांच्या घरावर दरड कोसळली. त्यामध्ये हलीमा अब्दुल कादिर परकार या जखमी झाल्या आहेत. आमदार सदानंद चव्हाण, उपविभागीय अधिकारी कल्पना जगताप, माजी सभापती शौकत मुकादम, शहराध्यक्ष रतन पवार, शहराध्यक्ष फैसल पिलपिले, समीर काझी, मुबारक सकवारे, दानिश काद्री, नूरभाई बिजले, यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.
वशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने चिपळूण शहरात पूर आला आहे. पूराचे पाणी बाजारपेठेसह अन्य भागात शिरले आहे. अतिवृष्टीचा तडाखा मुंबई-गोवा महामार्गाला बसला आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने जगबुडी पुलावरील वाहतूक थांबविण्यात आली. वशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने बहाद्दुरशेख पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर निवळी येथे चौपदरीकरणाच्या कामातील मातीचा भराव रस्त्यावर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.






























































