लांजा तालुक्यात शिवसेनेची तहसिल कार्यालयावर धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘शिवसेना झिंदाबाद’, ‘उद्धव साहेब आगे बड़ो हम तुम्हारे साथ है’, ‘शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे’ अशा घोषणा देत सोमवारी लांजा तालुक्यातील शेकडो शिवसैनिक यांनी लांजा तहसिल कार्यालयावर धड़क देऊन शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी सह सरसकट नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे अशी आग्रही मागणी राज्यपाल यांच्याकडे केली असून त्याचे निवेदन लांजा तहसीलदार वनिता पाटील यांच्याकडे केली.

लांजा तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी अतिवृष्टिमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी व मच्छीमार यांचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना शासनाकडून तातडीची मदत मिळावी या प्रमुख मागणी सह अन्य मागण्यांचे निवेदन लांजा तहसिदार यांना आज शिवसेनेच्या वतीने उपजिल्हा प्रमुख जगदिश राजापकर व लांजा तालुका प्रमुख संदिप दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली जोरदार शक्ति प्रदर्शन करीत सादर करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद् अध्यक्षा स्वरूपा साळवी, जिल्हा युवा अधिकारी विनय गांगण, लांजा नगराध्यक्ष सुनील कुरूप, उपसभापती श्रीकांत कांबळे, माजी सभापती चंद्रकांत मंणचेकर, पंचायत समिति सदस्या लीला घडशी, मानशी आंबेकर, लांजा शहर प्रमुख गुरुप्रसाद देसाई, लांजा शहर महिला आघाडी प्रमुख छाया गांगण, उपतालुका प्रमुख दिलीप पळसुले देसाई, सुरेश करमबळे ,विभाग प्रमुख शरद चरकरी, सचिन डोंगरकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी ओला दुष्काळ जाहीर करावा, सन 2018-19चे पीक कर्ज माफ करावे, क्यार चक्री वादळ व अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी व मच्छिमार यांचे आर्थिक नुकसान झाले असून सर्व शेतकरी यांना रेशन दुकानावर तातडीने अंत्योदय योजनेतून धान्य पुरवठा करावा, सरसकट नुकसान भरपाई देताना भात शेतीसाठी हेक्टरी 25 हजार तर फळबागांसाठी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळावी यासह अन्य मागण्या या निवेदनाद्वारे शिवसेनेच्या वतीने राज्यपालांकडे करण्यात आल्या असून या मागणीची तातडीने दखल न घेतल्यास यापेक्षा उग्र आंदोलन करण्याचा इशारा लांजा तालुका प्रमुख संदिप दळवी यांनी यावेळी दिला.