
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरांनी शनिवारी दिली आहे. दरम्यान, लतादीदींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी दुपारपासूनच राजकीय नेते, सेलिब्रेटी ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले. रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेतदेखील वाढ केली आहे. लतादीदी लवकर बऱया व्हाव्यात यासाठी जगभरातील चाहते प्रार्थना करीत आहेत.
कोरोना आणि न्युमोनियाची लागण झाल्यामुळे गेल्या 27 दिवसांपासून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ‘‘लता मंगेशकर यांनी कोरोना आणि न्युमोनियावर मात केली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे,’’ अशी माहिती काही दिवसांपूर्वीच राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली होती. मात्र आता पुन्हा लतादीदींची प्रकृती खालावली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि दैनिक ‘सामना’च्या संपादक सौ. रश्मी ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर, मधुर भंडारकर आदींनी रुग्णालयात जाऊन दीदींच्या प्रकृतीची विचारपूस केली.
लता मंगेशकर यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्या उपचारांना प्रतिसाद देत आहेत. डॉक्टरांची विशेष टीम त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून आहे.
– डॉ. प्रतीत समदानी


























































