आयुष्यावर समाधानी, ना खंत ना खेद! – ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर

ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांना यंदाचा राज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

लतादीदींच्या नावाचा पुरस्कार आणि तोही दीदींच्या वाढदिवसाला तुम्हाला मिळतोय. काय भावना आहेत? दीदींची पहिली प्रतिक्रिया काय होती?

– आजचा दिवस खूप छान आहे. लतादीदीच्या वाढदिवसाला हा पुरस्कार मला मिळावा, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. हा पुरस्कार सुरू करून 28 वर्षे झालीत. इतक्या वर्षांनी मी या पुरस्काराची मानकरी झाले. खरं सांगू, मी अतिशय समाधानी आहे. मला कधी पुठला पुरस्कार मिळावा, असं कधी वाटलं नाही. ना कसली खंत ना खेद!

पुरस्काराचं समजल्यावर दीदीने मला आशीर्वाद दिला. मीनाताई आणि हृदयनाथदेखील घरी आहेत. सगळे खूप आनंदित आहेत. दीदीच्या वाढदिवसाचं गिफ्ट जणू मला मिळालंय, असं वाटतंय.

संगीताचे बाळकडू तुम्हाला घरातून मिळाले. लतादीदी तुमच्या गुरू आहेत. दीदींनी गाणं कसं शिकवलं?

– होय, दीदी म्हणजे माझी गुरु. दीदीच्या गाण्यांनी खूप मदत झाली. तिचं गाणं ऐकून ऐकून मी शिकले. ती शब्द कसे बोलते, कसे सूर लावते, हे नकळत डोक्यात ठसत गेलं. उषा, अमुक कर असं तिने कधी सांगितलं नाही. तसं तिने सांगायची गरजही नव्हती. गाणं जसं ऐकलं की दिवसभर डोक्यात बसतं आणि आपण गुणगुणतो, तसे तिचे शब्दोच्चार, भावना कमी जास्त करण्याची पद्धत या गोष्टी नैसर्गिकरित्या डोक्यात बसल्या. त्यामुळे तशी एखादी ओळ दीदीच्या गाण्याच्या जवळची किंवा त्या टाईपची आली की, मी दीदी कशी गायली ते आठवायचे. आठवणीत शिक्का बसलेला असायचा. दुसरं म्हणजे गाणं आमच्या घराण्यातच आहे. बाबांचा वारसा आहे.

मंगेशकर पुटुंबीयांव्यतिरिक्त संगीत क्षेत्रातील कोणत्या व्यक्तींची आज या आनंदाच्या क्षणी आठवण येतेय?

– माझ्या संगीत कारकीर्दीत अनेकांचे योगदान आहे. सगळ्यात पहिलं नाव राम कदम. त्यांची सर्वात जास्त गाणी मी गायली. ’पिंजरा’ चित्रपट सगळ्यांना माहित आहे. निक्वळ आणि निक्वळ लावणी. छान चाली आणि शब्दांना संयम… गावरान भाषेतील गाणी कशी गावीत, त्यांचे उच्चार कसे करावेत, या लहानसहान अनेक गोष्टी राम कदम यांनी सांगितल्या. यानंतर नाव घेईन ते संगीतकार चित्रगुप्त यांचे. सतत गात राहिलं पाहिजे, लक्ष देऊन ऐकलं पाहिजे, असं चित्रगुप्त सांगायचे. गुजराती गायक, संगीतकार अविनाश व्यास यांचे नाव विसरता येणार नाही. मी मराठी, हिंदीपेक्षा गुजराती गाणी जास्त गायली आहेत. गुजराती फोक, गरबा, भजनं कशी गायची, याचे मार्गदर्शन अविनाश व्यास यांच्याकडून मिळाले. भूपेन हजारिका आहेत, सलील चौधरी आहेत.. अशी खूप नावं आठवतात.

कोणतं गाणं गायचं राहिलंय असं वाटतं का?

– खरं सांगू सगळीच गाणी मी आणखी चांगली गायली असती असं मला सारखं वाटतं. तसा प्रयत्न करते. आता वयोमानाप्रमाणे सूर थोडा कमी होतो. पण रियाजात खंड पडत नाही. वयाचा विचार करता दिवसाला 20 मिनिटांपेक्षा जास्त रियाज करत नाही. घरात गाण्यांचे रेका@र्डींग करते. सध्या दोन गाण्यांचे रेकाॅर्डिंग सुरू आहे. गाणं पाठ करते. सूर लावते. गाणं असं सुरुच आहे.

आपली प्रतिक्रिया द्या