
सामना प्रतिनिधी। लातूर
उसने घेतलेले पैसे परत करण्याच्या कारणावरून बोलावून घेऊन चाकूने भोसकल्याची घटना शहरातील प्रकाश नगर भागात घडली. या प्रकरणी दोघांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात सचिन विजय गायकवाड याने या प्रकरणी तक्रार दाखल केली. 10 मार्च रोजी सायंकाळी 5.15 वाजता त्याला मनिष हजारे याने फोन करून जुन्या रेल्वेलाईन जवळ असलेल्या सार्थक पान स्टॉलवर बोलावले. उसने घेतलेले पैसे देतो असे सांगितले. त्यामुळे तिथे गेल्यानंतर सचिनने पैसे मागितले असता त्याने माझ्याकडे पैसे नाहीत असे म्हटले. मग मला कशाला बोलावलास असे सचिनने विचारले असता मनिष आणि अतिष पाटोळे यांनी त्याला शिवीगाळ केली, लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर अतिषने त्याच्याजवळील चाकू सचिनच्या पोटात खुपसला. त्यावेळी तिथे आलेल्या बालाजी घोडके याने सचिनला मोटारसायकलवरून जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.






























































