लागवडी पुर्वीच कांदा काढतोय डोळ्यातून पाणी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लहान मुलांपासून ते वृद्ध माणसा पर्यंत सर्वांनाच जेवणात हवाहवासा वाटणारा कांदा सध्या अनेकांच्या संसारात वांदा करताना दिसत आहे. कांद्याच्या रोपाच्या भरमसाठ वाढत्या किंमती व कांद्यावर करपा रोपाचा प्रादुर्भाव यामुळे कांद्याचा ‘वांदा’ होताना दिसत आहे.

भादा व परिसरातील वडजी, जायफळ, शिवली, येल्लोरी भेटा या गावात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड दरवर्षी होत असते. मात्र या वर्षी लागवडीसाठी जोपासलेल्या रोपावर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा विपरीत परिणाम झाला व त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना रोपात मोठा अर्थिक फटका बसला आहे. त्यामूळे बाजारातही रोपांची मागणी जास्त व त्यामानाने पुरवठा कमी झाल्याने कांद्याच्या रोपाच्या किंमतीने कमीत कमी 80 रूपयांचा टप्पा पार केला. या दुहेरी संकटात सापडल्याने कांद्यावरील करपा रोगाने अक्षरशः शेतकऱ्यांचे कांद्याचे स्वप्नच करपावले. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना कमीत कमी एक किंवा दोन एकर कांदा लागवड करायची आहे अशा शेतकऱ्यांना हा वाढता अर्थिक बोजा परवडत नसल्याने सध्या तरी लागवडी पुर्वीच कांदा काढतोय डोळ्यातून पाणी. एवढे करूनही कांदा लागवड केलीच तर भविष्यात कांद्याला ‘भाव’ राहील का व्यापारीच ‘भाव’ खातील हा ही प्रश्न शेतकऱ्यांपुढे अनुत्तरीत आहे. मात्र असे काहीही असले तरी कांदा आत्ताच वांदा करताना दिसत आहे. त्यामुळे लागवडी पुर्वीच कांदा डोळ्यातून ‘पाणी’ काढताना दिसतोय एवढं मात्र खरं..