जागतिक चहा दिनानिमित्त जाणून घ्या चहाचा इतिहास

1153

जगात सगळीकडे चहा प्रेमी आढळतात. प्रत्येक देशात वेगगेळ्या प्रकारे चहा बनवला जातो. हिंदुस्थानातही वेगवेगळ्या प्रकारे चहा बनवला जातो. एक साधारण हिंदुस्थानी चहाशिवाय राहूच शकत नाही असे म्हटल्यास वावगे ठरू नये. हिंदुस्थानात चहा प्रेमींसाठी चहा फक्त पेय नसून एक भावना आहेत. परंतु हा चहा हिंदुस्थानात आलाच कसा ? आज चहा उत्सव म्हणजेच आंतरराष्ट्रीय चहा दिवस असल्यामुळे चहाचा इतिहास जाणून घेऊयात.

हिंदुस्तानात चहाच्या लागवडीसंबंधीच्या दिशेने पहिले पाऊल 1778 मध्ये उचलण्यात आले. त्यावर्षी सर जोसेफ बॅंक्स यांना हिंदुस्तानात चहाची लागवड सुरू करावी अशी ईस्ट इंडिया कंपनीला शिफारस केली.1793 मध्ये बॅंक्स यांना चहाच्या लागवडीसंबंधी आणि पानांपासून चहा तयार करण्यासंबंधी तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी चीनमध्ये पाठविण्यात आले. त्यांनी चिनी चहाची झाडे व बिया कलकत्त्याला पाठविली. 1823 मध्ये रॉबर्ट ब्रूस नावाच्या सैन्यातील अधिकाऱ्यांना आसाममधील सादियानजीकच्या जंगलात चहाची झाडे नैसर्गिक अवस्थेत वाढत असल्याचे आढळून आले. ही झाडे ईस्ट इंडिया कंपनीच्या वनस्पतिशास्त्रज्ञाकडे पाठविण्यात आली. परंतु ती खरी चहाची झाडे नसल्याबद्दलचे मत त्यांनी दिले.

सैन्यातील चार्ल्‌टन नावाच्या दुसऱ्या एका अधिकाऱ्यांना 1831 साली आसाममध्ये चहाची झाडे आढळून आली ती त्यांनी कलकत्त्याला पाठविली, परंतु तज्ञांनी ती खरी चहाची झाडे नसल्याचा निर्वाळा दिला. दरम्यान 1828 मध्ये लॉर्ड बेंटिंक यांची

हिंदुस्थानचे गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाल्यावर त्यांना वॉकर नावाच्या एका सद्‌गृहस्थांनी लंडन मुक्कामी एक निवेदन सादर केले. त्यात त्यांनी नेपाळच्या टेकड्यांत चहाची लागवड करण्यासंबंधी शिफारस केली आणि त्याची कारणेही त्यात नमूद केली. व्यापारी संबंध बिघडल्यामुळे चीनमधून चहाची आयात बंद होण्याची शक्यता आणि इंग्लिश लोकांच्या जीवनातील चहाला वाढते महत्त्व या गोष्टी लक्षात घेता चहाच्या बाबतीत केवळ चीनवर अवलंबून न राहता ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलाखालील प्रदेशातच चहाची लागवड करणे कसे फायद्याचे आहे, हे त्यांनी विशद केले.

हिंदुस्तानात कमी रोजावर मजूर मिळण्याची शक्यता आणि मॅंचेस्टर येथील गिरण्यांत यंत्रमागांवर तयार होणाऱ्या कापडाच्या आणि मलमलीच्या आयातीमुळे हिंदुस्थानातील हजारो बेकार विणकरांना कामधंदा मिळवून देण्याचा चहा उद्योग हा एक पर्याय याही गोष्टी हिंदुस्तानात चहाची लागवड सुरू करण्यासाठी अनुकूल असल्याचे त्यांनी नमूद केले. बेंटिंक यांनी यावर पूर्ण विचार करून एक समिती नियुक्त केली. आसामच्या जंगलात आढळून आलेली चहाची झाडे ही चिनी चहाच्या जातीची नसल्याचा समितीतील तज्ञांचा अभिप्राय पडला आणि चीनमधून चहाची झाडे व त्याचबरोबर चहाची लागवड करणे आणि पानांपासून चहा तयार करणे या बाबींतील वाकबगार लोक आणून हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश, उत्तर आसाम आणि दक्षिण हिंदुस्तानमध्ये या ठिकाणी चहाची लागवड करावी, असे ठरविण्यात आले.

1835 च्या सुमारास चिनी चहाच्या बियांपासून हिंदुस्तानात वरील भागांत चहाच्या लागवडीला सुरुवात झाली. नंतर आसाममध्ये पूर्वीपासून जंगलात वाढत आलेली चहाच्या जातीची झाडे ही खरी चहाचीच झाडे असल्याचा निर्णय तज्ञांच्या समितीने दिला. 1839 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या मळ्यांत तयार झालेला चहा लंडन येथील बाजारात प्रथमच लिलावाने विकला गेला. यावेळेपर्यंत चीनमधून आणविलेल्या बियांपासून पुष्कळ ठिकाणी लागवड करण्यात आली होती व उत्तर आसाममध्ये कित्येक भागांत देशी जातीची झाडे मोठ्या संख्येने उपलब्ध असल्याचेही आढळून आले. 1840 मध्ये आसाम टी कंपनीची स्थापना झाली आणि यावर्षी ईस्ट इंडिया कंपनीच्या बहुतेक सर्व चहाच्या मळ्यांचे या कंपनीकडे दहा वर्षांच्या कराराने हस्तांतर झाले. 1855 मध्ये काचार (दक्षिण आसाम) भागात पुष्कळ ठिकाणी देशी चहाची झाडे आढळून आली. देशी चहाच्या झाडांपासून चांगल्या प्रकारचा चहा तयार होतो असे आढळून आल्यावर चिनी आणि देशी अशा दोन्ही प्रकारांची लागवड करण्यात येऊ लागली.

थोड्याच काळात आसाममधील ब्रह्मपुत्रेचे खोरे व काचार, हिमालयाच्या पायथ्याचा दुआर व तराई हा डोंगराळ भाग, दार्जिलिंग, रांची, उत्तर प्रदेशातील डेहराडून खोरे आणि पंजाबमधील कांग्रा खोरे या ठिकाणी चहाची लागवड होऊ लागली. 1853 नंतर दक्षिण हिंदुस्तानातील तमिळनाडू, केरळ व कमी प्रमाणात कर्नाटकात लागवडीस सुरुवात झाली. 1859 मध्ये जोरहाट कंपनी ही चहाची दुसरी कंपनी स्थापन झाली व त्यानंतर अनेक ब्रिटिश भांडवलदारांनी मुख्यत्वे त्यांच्या देशातील ग्राहकांना चहा पुरविण्याकरिता या व्यवसायात पाऊल टाकले.हिंदुस्तानातील चहाचा उद्योग 1870च्या सुमारास चांगल्या प्रकारे विकासाच्या मार्गास लागला. 1881 मध्ये इंडियन टी असोसिएशन आणि 1918 मध्ये इंडियन टी प्लॅंटर्स असोसिएशन या संस्था स्थापन झाल्या.

संदर्भ मराठी विश्वकोश : चहा

आपली प्रतिक्रिया द्या