ब्राझीलच्या पराभवाने लेबेनॉनमध्ये ‘मातम’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बैरुत

पाच वेळ फुटबॉल वर्ल्डकप जिंकणाऱ्या ब्राझीलला २१ व्या विश्वचषकात युरोपिअन बेल्जियमने शनिवारी पहाटे २-१ असे पराभूत केले. ब्राझीलचा हा पराभव शिया मुस्लिम बहुसंख्य असलेल्या लेबेनॉनच्या फुटबॉल शौकिनांनी मनाला फारच लावून घेतला आहे. लॅटिन अमेरिकन ब्राझीलचा पराभव म्हणजे आमचाच पराभव असल्याचे आम्ही मानतो असे लेबेनॉनी फुटबॉलशौकीन सांगत आहेत. ब्राझील आणि बेल्जियम यांच्यातील उपांत्यपूर्व लढत संपल्यावर लेबेनॉनी राजधानी बैरुतमध्ये ‘मातम’चे वातावरण होते. त्याचे कारणही तसेच आहे. लाखो लेबेनॉनी निर्वासित १९ व्या शतकाच्या अखेरीस ब्राझीलमध्ये जाऊन स्थायिक झाले आहेत. त्यातील काही राजकारणात उच्च पदावरही पोचले आहेत. त्यामुळे लेबेनॉनी मुस्लिमांत ब्राझील हा आपलाच देश असल्याची भावना आहे.

ब्राझील उपांत्यपूर्व वर्ल्डकप लढत जिंकणारच या निर्धाराने बैरुतमध्ये लाखो फुटबॉलशौकीन शुक्रवारी रात्री ब्राझिलियन पिवळी जर्सी परिधान करून बेल्जियम व ब्राझील लढत पाहायला रस्त्यावर उतरले होते. हैदर बद्दर या व्यापाऱ्याने तर बैरुतच्या गर्दी असलेल्या चौकात जायन्ट टीव्ही स्क्रीन लावला होता. हजारो फुटबॉलशौकीन ब्राझीलचा गणवेश परिधान करून फिफा विश्वचषकातील बेल्जियम आणि ब्राझील लढतीसाठी रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. पण ब्राझीलच्या पराभवाने या फुटबॉलशौकिनांत दुःखाची लाट पसरली. ब्राझील हा आम्ही आमचा देश मानतो. त्यामुळे ब्राझील हरल्याचे दुःख आम्हाला होणारच. ब्राझीलवरून आम्ही जीवही ओवाळून टाकू, मग भले तो संघ जिंकला काय आणि हरला काय. आमचे ब्राझीलवरील प्रेम कधीच कमी होणार नाही, अशी प्रतिक्रिया अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची डिलरशिप सांभाळणारा उद्योजक अली याने लढत संपल्यावर व्यक्त केली.

युद्धग्रस्त लेबेनॉनचे लाखो निर्वासित ब्राझीलमध्ये
अरब- इस्रायल युद्ध , गरिबी आणि दहशतवादाने जर्जर झालेल्या लेबेनॉनचे लाखो नागरिक १९ व्या शतकाच्या अखेरीपर्यंत सहकुटुंब ब्राझीलमध्ये स्थायिक झाले. ब्राझिलियन राष्ट्राध्यक्ष मिचेल टेमेर यांचे कुटुंबही लेबेनॉनमधून स्थलांतर करून ब्राझीलमध्ये स्थायिक झाले आहे. त्यामुळेच ब्राझील हा आपलाच देश असल्याची तीव्र भावना लेबेनॉनच्या नागरिकांत घर करून आहे. इथे फुटबॉलचे एवढे वेड आहे कि मैदाने नसली तरी मुले आणि युवक सायंकाळी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून फुटबॉल खेळतात. अनेकांनी फुटबॉलच्या वेडापायी शिक्षणही सॊडल्याचे बैरुतचा बेरोजगार युवक हुसेन मोहम्मद याने सांगितले. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने पूर्ण बैरुत शहर ब्राझीलमय झाल्याचे चित्र दिसले. अनेकांनी आपल्या घरावर ब्राझीलचे राष्ट्रध्वज लावले होते.