यो-यो चाचणीस सुनील गावस्कर यांचा विरोध : प्रत्येक खेळाडूसाठी फिटनेसचे निकष वेगवेगळे असावेत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी खेळाडूंच्या फिटनेसचा दर्जा राखण्यासाठी बीसीसीआयने पुन्हा एकदा यो-यो चाचणी लागू केली आहे. आता यो-यो चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतरच खेळाडूची संघात निवड होऊ शकते. माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी मात्र या चाचणीला विरोध केला आहे. फिटनेस मोजण्यासाठी यो-यो चाचणी हा एक मापदंड नसावा, असे त्यांनी म्हटले आहे. यो-यो चाचणी अनेक वर्षांपासून हिंदुस्थानी संघाच्या फिटनेस दिनचर्याचा एक भाग होती. ही चाचणी फिटनेससाठी एक बेंचमार्क मानली जाते. विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्या कार्यकाळात याची अंमलबजावणी करण्यात आली आणि त्यामुळे अनेक बड्या खेळाडूंची त्यावेळी भारतीय संघात निवड होऊ शकली नाही.

आता पुन्हा एकदा यो-यो चाचणी लागू करण्यात आली आहे. सुनील गावस्कर यांनी या चाचणीस विरोध केला आहे. ‘प्रत्येकासाठी फिटनेस वेगळा असतो. स्पिनर्सपेक्षा वेगवान गोलंदाज अधिक तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. यष्टिरक्षकांना आणखी तंदुरुस्तीची आवश्यकता असते आणि फलंदाजांना कमीत कमी तंदुरुस्तीची आवश्यकता असते. या कारणास्तव, प्रत्येकासाठी समान स्केल सेट करणे योग्य नाही. या फिटनेस चाचण्या प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत सर्वांसमोर झाल्या, तर कोण उत्तीर्ण झाले आणि कोण नापास झाले, हे वास्तव कळेल.