पी.टी. उषा, इलया राजांसह चौघे दिग्गज राज्यसभेवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंतरराष्ट्रीय पातळीवर हिंदुस्थानचे नाव उज्ज्वल करणाऱ्या प्रसिद्ध धावपटू पी. टी. उषा, ज्येष्ठ संगीतकार इलया राजा यांच्यासह वीरेंद्र हेगडे आणि क्ही. विजयेंद्र प्रसाद गारु यांची राज्यसभेवर निवड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी या चारही दिग्गजांचे ट्विटरवरून अभिनंदन केले.

प्रत्येक हिंदुस्थानीसाठी एक प्रेरणास्थान असलेल्या आणि गेल्या काही वर्षांत अनेक नकोदित खेळाडूंना मार्गदर्शन करणाऱ्या पी. टी. उषा यांचे कार्य तितकेच प्रशंसनीय आहे, असे कौतुक पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरून केले. व्ही. विजयेंद्र प्रसाद गारु यांच्या कार्यातून हिंदुस्थानच्या गौरवशाली संस्कृतीचे दर्शन घडले आहे. वीरेंद्र हेगडे हे उत्कृष्ट समाजसेवेत आघाडीवर आहेत. आरोग्य, शिक्षण आणि संस्कृतीच्या क्षेत्रात त्यांनी महान कार्य केले आहे. ते संसदीय कामकाज समृद्ध करतील. संगीतकार इलया राजा यांनी पिढ्यानपिढ्या लोकांना मंत्रमुग्ध केले आहे. संगीतातील त्यांच्या रचनांतून अनेक भावनांचे सुंदर दर्शन घडते. त्यांचा जीवनप्रवासदेखील प्रेरणादायी आहे, अशा शब्दांत पंतप्रधानांनी चारही दिग्गजांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करून त्यांना शुभेच्छा दिल्या.